अहिवंत किल्ला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 August 2020
  • नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्र्चिम जाणाऱ्या सातमाळ डोंगरांगेत १८ किल्ले आहेत. त्यापैकी अहिवंतगड हा प्रमुख किल्ला होता.
  • किल्ल्याचा प्रचंड आकार, त्यावरील अनेक वाड्यांचे अवशेष, मोठी तळी हे किल्ल्याचे मोठेपण अधोरीखित करतात.

नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्र्चिम जाणाऱ्या सातमाळ डोंगरांगेत १८ किल्ले आहेत. त्यापैकी अहिवंतगड हा प्रमुख किल्ला होता. किल्ल्याचा प्रचंड आकार, त्यावरील अनेक वाड्यांचे अवशेष, मोठी तळी हे किल्ल्याचे मोठेपण अधोरीखित करतात. अचला, मोहनदर या दोन टेहळणीच्या किल्ल्यांची निर्मिती अहिवंतगडाच्या संरक्षणासाठी करण्यात आली असावी. अहिवंतगडचा आकार प्रचंड मोठा असल्यामुळे अहिवंत आणि त्याच्या बाजूचा बुधल्या (बुध्या) डोंगर पाहाण्यासाठी अर्धा दिवस लागतो.

खाजगी वाहानाने अचला, अहिवंत आणि मोहनदर हे तीन किल्ले दोन दिवसात व्यवस्थित पाहून होतात. पहिल्या दिवशी अचला, अहीवंत पाहून दरेगावातील आश्रमशाळेच्या व्हरांड्यात मुक्काम करून दुसऱ्या दिवशी मोहनदर किल्ला पाहात येईल.

इसवीसन १६३६ मध्ये अहिवंतगड निजामशाहीच्या ताब्यात होता. मुघल बादशाहा शाहजहानने नाशिक भागातील किल्ले काबिज करण्याची जबाबदारी शाहिस्तेखानावर सोपवली. शाहिस्तखानाचा सरदार अलिवर्दीखानाने अहिवंतगड जिंकून घेतला. इसवीसन १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला मुघलांकडून जिंकून घेतला.

सुरत, करंजा सारख्या शहरांची लुट, मुघलांचे किल्ले जिंकून घेणे या शिवाजी महाराजांच्या कारवायांमुळे औरंगजेब बादशहा संतापला होता. त्याने आपल्या दक्षिणेस असलेल्या सरदाराला महाबतखान अहिवंतगड घेण्याची आज्ञा केली. महाबतखान नाशिकला असलेल्या दिलेरखानाला सोबत घेऊन त्याने अहिवंतगडाला वेढा महाबतखानाने महादरवाजावर तर दिलेरखानाने पिछाडीला मोर्चे लावले. एक महिना झाला तरी अहिवंतगड दाद देत नव्हता. या दरम्यान दंतकथेत शोभावी अशी घटना घडली. या घटनेची नोंद भिमसेन सक्सेनाच्या तारीखे दिल्कुशा आणि जेथे शकावलीतही सापडते.

दिलेरखानाच्या छावणीत एके दिवशी एक ज्योतिषी आला. त्याला दिलेरखाना समोर पेश करण्यात आल. त्याला किल्ला कधी हाती येईल अस विचारल्यावर त्याने साखर मागवली. साखरेने त्याने अहिवंत गडाचा नकाशा काढला. साखरेनेच महाबत खान आणि दिलेरखानाचे मोर्चे दाखवले. त्यानंतर त्याने आपल्या पिशवीतील पेटीतून एक मुंगळा बाहेर काढला आणि त्या साखरेच्या किल्ल्यावर सोडला. त्या मुंगळ्याने महाबत खानाने महादरवाजावर लावलेल्या मोर्च्याकडे गेला त्यानंतर तो दिलेरखानाच्या मोर्च्याकडे गेला. तिकडून किल्ल्यात प्रवेश केला. त्यावरून ज्योतिषाने गणित मांडली आणि सांगितले की, महाबतखानाकडून महादरवाजावर निकराचा हल्ला होईल. पण ६ दिवसांनी किल्ला दिलेरखानाच्या मोर्च्याकडून हस्तगत होईल.

ज्योतिषाने सांगितले भविष्य सहा दिवसांनी खरे ठरले. महाबतखानाने महादरवाजावर तिखट मारा केला. किल्ल्यावरील दारूगोळा, धान्य संपत आले होते. त्यामुळे मराठ्यांनी किल्ला सोडण्याचा निर्णय घेतला. महाबतखान निकराने किल्ला लढवत असल्यामुळे त्याच्याकडे जाण्यात अर्थ नव्हता म्हणून मराठ्यांनी आपला दुत दिलेरखानाकडे पाठवला आणि किल्ला देण्याची इच्छा व्यत्त्क केली. दिलेरखानाने मराठ्यांना किल्ल्या बाहेर सुखरूप जाण्याचा मार्ग दिला आणि किल्ला ताब्यात घेतला. इसवीसन १८१८ मध्ये सर प्रॉथर याने किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News