राज्यातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिक्षण व्यवस्था पूर्णपणे संकटात आलेली आहे. त्यामुळे कोरोना सारख्या महामारीच्या संकटातून बाहेर येई पर्यंत सद्या तरी ऑनलाईन शिक्षणाची पद्धत चांगली आहे. परंतु कायमस्वरूपी ह्या पद्धतीकडे पाहून चालणार नाही. स्टडी फ्रॉम होम, वर्क फ्रॉम होम या पद्धतींने सर्वांगीण विकासाचा विचार केला तर तोटाच जास्त प्रमाणात होईल, असे मला वाटते. काही गोष्टी या अगोदर पासूनच आपली जागा निर्माण करण्याच्या तयारीत होत्या आणि त्यात ह्या कोरोनाच्या काळात झालेल्या लॉकडाउन मुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीला तशी संधीही मिळाली.
शाळेतील वर्ग हा मनाला ताजेतवाना करणारा स्रोत आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेताना वयोगट खूप महत्त्वाचा आहे. तस पाहिलं गेले तर बालवाडीपासून ते बारावीपर्यंत च्या ऑनलाईन शिक्षणाचा जास्त फायदा मुलांना होणार नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण हे बारावीच्या पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल. तसा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये आजही विजेची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच ग्रामीण भागातील सर्वच विद्यार्थ्यांकडे संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन उपलब्ध नसतो.
समाजामध्ये खूप कुटुंब अशी आहेत की त्यांना दोन वेळच जेवण सुद्धा मिळत नाही, आणि चार भिंतीचा निवारा सुद्धा नाहीये, त्यांनी ऑनलाईन पद्धतीचे शिक्षण कसे घ्यायचे, त्याहीपलीकडे पाहिलं गेले तर जिथे मोबाईलाच रेंज नाही, अशा ठिकाणी ऑनलाईन शिक्षण पद्धती हास्यास्पद का नाही ठरणार. त्यामुळे माझ्या मते तर खडू,फळा, पाटी, पेन्सिल, दप्तर, वही ह्या वस्तू विद्यार्थ्यांसाठी खूप मोलाच्या आहेत. या वस्तूंमुळे तर विद्यार्थ्यांना खरी शिक्षणाची गोडी निर्माण होते.
मुख्य म्हणजे ऑनलाईन शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना जे शिकवले जाते, ते त्यांना समजते का? हे पण खूप महत्वाचे आहे. सद्याच्या काळात तर जन्माला आलेल्या मुलापासून ते अगदी मोठया व्यक्तींपर्यत सर्वांनाच मोबाईलचे भयंकर प्रमाणात वेड लागले आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने कितपत मुले चांगले शिक्षण घेतील की बिघडतील याचाही विचार केला पाहिजे.
शहरी भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा फायदा घेता येईल. पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे कसे होणार? ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या अशा एक ना अनेक प्रकारच्या समस्या आहेत, त्यामुळे सर्वसामान्य माणसाला शिक्षण घेता येईल, अशी एकमेव शिक्षण पद्धत ही पारंपरिक शिक्षण पद्धतीच आहे. आणि ती तळागाळातील सर्व विद्यार्थ्यांच्या फायदेशीर आहे, असे मला वाटते. त्यामुळे सरकारच्या डोक्यात ऑनलाईन पद्धतीचे जे खूळ भरले आहे. ते काढून टाकावे नाहीतर ऑनलाईन पद्धतीच्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्या.