रोजगार निर्मितीसाठी उद्योगस्नेही धोरणाचा अवलंब 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 24 June 2020
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

मुंबई : राज्यात कोरोना संकटानंतर आता राज्यात उद्योगांचे अर्थचक्र सुरू झाले आहे. राज्यात गुंतवणूकदारांसाठी उद्योगस्नेही धोरणाचा अवलंब केला जात आहे. अनेक अनावश्‍यक परवानग्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुंतवणूक वाढून रोजगारनिर्मिती वाढावी, यासाठी आणखी काही पारवानग्यांची संख्या कमी करून ही प्रक्रिया अधिक सोपी करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.

आज खासगी गुंतवणूक संस्थांच्या (प्रायवेट इक्विटी फर्म्स) प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांनी व्हिडीयो कॉन्फन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. पी. अनबलगन उपस्थित होते. कोरोनाने आपल्याला घरी रहा- सुरक्षित रहा हे शिकवले आहे. याच धर्तीवर राज्यातील गुंतवणूक सल्लागारांनी सर्व गुंतवणूकदारांना राज्यातच गुंतवणूक करण्याचा सल्ला द्यावा. राज्यातील त्यांची गुंतवणूक ही सुरक्षित राहील, हा विश्वास त्यांनी निश्‍चित ठेवावा. राज्यात ग्रीन इंडस्ट्रीला चालना देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या उद्योगांना खूप परवानग्यांची गरज नाही आणि ज्यांची लगेच सुरुवात करता येईल, अशा उद्योगांना ग्रीन उद्योग झोनमधून तत्काळ कार्यरत करण्याची प्रक्रिया सुरू करता येईल. यासाठी सिंगल विंडो सिस्टीम त्यांना मदतीची ठरू शकेल, असेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.

मुंबईजवळ मॉडेल फार्मा पार्क

राज्याने उद्योगस्नेही धोरणाचा अवलंब केलेला आहे. परवानग्यांची संख्या 76 वरून 25 वर आणली आहे. भविष्यातही राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी आलेल्या सर्व तज्ज्ञांच्या सूचनांचे स्वागत केले जाईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या वेळी सांगितले. मुंबईनजीकच मॉडेल फार्मा पार्क तयार करण्यात येत आहे. त्याचबरोबर नव्या तंत्रज्ञानावर आधारित इलेक्‍ट्रॉनिक पार्कही उभे राहात आहे. उद्योगवाढीच्या योजनांसाठीची ही केवळ सुरुवात असल्याचे देसाई या वेळी म्हणाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News