१२ वी नंतर प्रवेशासाठी ही कागदपत्रे आवश्यक

हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक
Friday, 7 June 2019

बारावीनंतर प्रवेशासाठी टप्प्यात कागदपत्रांची पडताळणी करताना सर्व मूळ दाखले, कागदपत्रे सादर करावे लागतात.

बारावीनंतर आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, फार्मसीसह अनेक शाखांच्या प्रवेशासाठी जूनमध्ये नावनोंदणी सुरू होईल. ती करताना कोणतेही दाखले अपलोड करावे लागत नाहीत. परंतु त्यानंतरच्या टप्प्यात कागदपत्रांची पडताळणी करताना सर्व मूळ दाखले, कागदपत्रे सादर करावे लागतात. पडताळणी केल्यानंतर मूळ कागदपत्रे परत मिळतात. प्रत्यक्ष संस्थेमध्ये प्रवेश घेताना मात्र मूळ कागदपत्रे त्यांच्याकडे जमा करावी लागतात. 

सर्वसाधारणपणे प्रवेशासाठी सर्वांसाठी आवश्‍यक डोमिसाईल, वय, अधिवास राष्ट्रीयत्व दाखला, एससीएसटी वगळता उर्वरित कोणत्याही आरक्षणातून प्रवेशासाठी नॉन क्रिमिलेअर दाखला (आई-वडील एकत्रित कुटुंबाचे उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी असल्याचा दाखला), आरक्षणातून प्रवेशासाठी जातीचा दाखला, जातवैधता प्रमाणपत्र असल्याशिवाय आरक्षणातून प्रवेश मिळत नाही. एससी-एसटीसाठी सर्व शैक्षणिक शुल्क माफ होते, तसेच एनटी १, २, ३ साठीही पूर्ण शुल्कमाफी होते. ओबीसी, एसईबीसी, ई डब्ल्यूएस यांना ५० टक्के शुल्कमाफी मिळते. त्यासाठी व राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी २०१८-१९चा आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला आवश्‍यक आहे.

आरोग्य विज्ञान शाखेतील प्रवेश :
गॅप सर्टिफिकेट ः शासकीय एमबीबीएस प्रवेशासाठी प्रचंड स्पर्धा असते. पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यास विद्यार्थी वर्षभर गॅप घेऊन ‘नीट’ परीक्षा रिपीट करतात. त्यांना या दाखल्याची आवश्‍यकता लागते. आरोग्य विज्ञान शाखेतील इतर कोणत्याही शाखेत प्रवेश घेऊन पुन्हा ‘नीट’ रिपीट करून एमबीबीएस प्रवेश घेता येत नाही. हा या दाखल्याचा मुख्य उद्देश आहे. दाखल्यामध्ये ‘नीट... संपूर्ण नाव - मागील वर्षी मार्च-२०१८ मध्ये बारावी परीक्षा दिली असून, त्यानंतर शैक्षणिक वर्ष २०१८-१९ ते आजपर्यंत कोणत्याही संस्थेत अथवा कोणत्याही शाखेत प्रवेश घेतला नसून, या कालावधीत गॅप घेतला’ हा मजकूर असणे आवश्‍यक आहे. राज्यात कोठेही ठराविक नमुना नाही, त्यामुळे गोंधळ आहे. वास्तविक पाहता ‘नीट परीक्षा रिपीट करण्यासाठी गॅप घेत आहे,’ हे कारण न देता अनेक ठिकाणी आजारी असल्यामुळे, प्रापंचिक अडचणीमुळे गॅप घेतला असे नमूद केले जाते. असे असले तरीही हा दाखला चालतो.
 
बोनाफाइड दाखला ः जे विद्यार्थी यंदा प्रथमच २०१९ मध्ये ‘नीट’ व बारावी परीक्षा देत आहेत, त्यांना या दाखल्याची आवश्‍यकता नाही. आरोग्य विज्ञान शाखेव्यतिरिक्त ज्यांनी कृषी, अभियांत्रिकी किंवा इतर शाखेत प्रवेश घेऊन यंदा ‘नीट’ रिपीट करून प्रवेश घेऊ इच्छितात त्यांनी सदर शिक्षण घेत असलेल्या संस्थेतून बोनाफाईड दाखला घ्यावा.

वैद्यकीय प्रमाणपत्र ः माहितीपत्रकातील नमुन्यामध्येच हा दाखला प्राप्त करावा लागतो. त्यामुळे हा दाखला काढण्याची घाई करू नये. शक्‍यतो नमुन्यामध्ये बदल होत नाही. तसेच जूनमध्ये माहितीपत्रक प्राप्त झाल्यानंतर कागदपत्रे पडताळणीच्या दिनांकापर्यंत भरपूर वेळ उपलब्ध होतो. 

कृषी प्रवेशासाठी ः कृषी शाखेतील प्रवेशासाठी काही अतिरिक्त गुण दिले जातात. मत्स्य व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील किंवा शेती व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील उमेदवार, ज्याची स्वतःची, आई-वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावे शेतजमीन असल्याबाबत सातबारा उतारा, किंवा भूमिहीन शेतमजूर, शेतकरी असल्याबाबतचे संबंधित अधिकारी किंवा तहसीलदार यांचे प्रमाणपत्र असल्यास १२ गुण मिळतात. त्याचबरोबर एनसीसी, विविध खेळ यांना प्रत्येकी दोन गुण तसेच कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे पाल्यांना ३ गुण मिळतात. त्यासाठी योग्य ते दाखले काढावेत. वरील गटातून बीव्हीएस्सीसाठीही काही जागा उपलब्ध होतात.

अपंग प्रमाणपत्र ः अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी शाखेतील अपंग प्रवर्गातून प्रवेशासाठी जिल्हा रुग्णालयातून प्रमाणपत्र प्राप्त करावे. वैद्यकीय प्रवेशासाठी मात्र जिल्हा रुग्णालयातील प्रमाणपत्राबरोबरच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसीन ॲण्ड रिहॅबिलिटेशन, मुंबई येथूनच प्रमाणपत्रे प्राप्त करावे लागते.

ईडब्ल्यूएस आरक्षण ः केंद्र सरकारने नव्याने जाहीर केलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातून १० टक्के आरक्षणातून प्रवेशासाठी जातीच्या दाखल्याची, तसेच जातवैधता प्रमाणपत्राची आवश्‍यकता नाही. इतर कोणत्याही आरक्षणात समाविष्ट नसणारा वर्ग यामध्ये सामील होऊ शकतो. आरक्षणासाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राचीही आवश्‍यकता नसून, फक्त २०१८-१९मधील उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी, त्याचबरोबर ५ एकरपेक्षा कमी शेतजमीन, १ हजार चौरसफुटांपर्यंतचे घर, १०० चौरस यार्डापेक्षा जास्त प्लॉट महापालिका, नगरपालिका हद्दीत किंवा हद्दीबाहेर २०० चौरस यार्डापेक्षा मोठा प्लॉट नसावा.     

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News