अभिनेत्री जेनिफर विंगेट हिचे वेबविश्‍वातील पदार्पण 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 January 2020

आठ भागांची ही मालिका जेनिफरने स्वतःच्या खांद्यावर तोलली आहे. राजस्थानमधील एका गावात रात्रीच्या अंधारात तीन भारतीय सैनिक आणि दोन दहशतवाद्यांची चकमक उडते. या चकमकीत ते दोन्ही दहशतवादी ठार होतात, तर भारतीय सैन्यदलातील एक अधिकारी शहीद होतो.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेट हिचं वेबविश्‍वातील पदार्पण असणारी ‘कोड एम’ ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमध्ये जेनिफर आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत आहे. आठ भागांची ही मालिका जेनिफरने स्वतःच्या खांद्यावर तोलली आहे.

राजस्थानमधील एका गावात रात्रीच्या अंधारात तीन भारतीय सैनिक आणि दोन दहशतवाद्यांची चकमक उडते. या चकमकीत ते दोन्ही दहशतवादी ठार होतात, तर भारतीय सैन्यदलातील एक अधिकारी शहीद होतो. एकीकडे आर्मी शहीद अधिकाऱ्याच्या कार्याला मानवंदना देत असतानाच त्या इमारतीबाहेर ही चकमक खोटी असल्याचे सांगत गावकरी जमा होतात.

दहशतवादी म्हणून ठार करण्यात आलेले दोन भाऊ हे त्याच गावातील नागरिक असतात. आपल्या निरपराध मुलांना ठार केल्याचा आरोप करत त्यांची आई सर्वांसमक्ष स्वतःला जाळून घेते, ज्यात ती गंभीर जखमी होते. या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटतात. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेली वकील मोनिका मेहराची नियुक्ती केली जाते.

ही नियुक्ती कर्नल सूर्यवीर चौहान यांच्या सांगण्यावरून केली जाते. या चकमकीत ठार झालेला भारतीय अधिकारी कर्नल चौधरी यांचा होणारा जावई असतो. चौधरी यांची मुलगी मोनिकाची खूप जवळची मैत्रीण असल्याने मोनिकासाठी हा मोठा धक्का असतो. स्वतःचं लग्न दोन आठवड्यांवर आलं असतानादेखील मोनिका या केसवर काम करण्यासाठी दाखल होते.

सुरुवातीला अतिशय साधी सोपी वाटणारी ही केस कमालीची गुंतागुंत वाढवणारी ठरते. शहीद अधिकाऱ्यासोबत या चकमकीत सहभागी असणाऱ्या आणखी दोन अधिकाऱ्यांभोवती संशयाची सुई सतत फिरत राहते. त्यातच या अधिकाऱ्यांचा वकील म्हणून ज्याची नियुक्ती होते तो मोनिकाची पूर्वाश्रमीचा प्रियकर अंगद निघतो. अंगदच्या मदतीने मोनिका या प्रकरणाच्या मुळाशी जाते.

त्यातून काय सत्य समोर येतं ते सीरिजमध्ये विस्तृतपणे मांडण्यात आलं आहे.ही सीरिज आर्मीतील शिस्त, मेहनत, त्यांच्यावर केले जाणारे खोट्या चकमकींचे आरोप, समलैंगिक संबंध, जातीपातीचं राजकारण अशा अनेक विषयांना स्पर्श करत पुढे सरकते. कथानक उत्कंठा वाढवणारं असलं तरी काही संदर्भ खटकतात, तर काही प्रसंग विनाकारण ताणल्यासारखे वाटतात. 

या मालिकेचं सबकुछ जेनिफर असं वर्णन करता येईल. जेनिफर विंगेटने मेजर मोनिकाचं तिचं वैयक्तिक आयुष्य, अधिकारी म्हणून तिचा वावर ताकदीने साकारला आहे. रजत कपूर आणि तनुज विरवाणी यांनीही कर्नल चौधरी आणि अंगद यांच्या भूमिका छान साकारल्या आहेत.

आजवर सैन्यदलावर आधारित मालिकांमध्ये स्त्री अधिकाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून लिहिण्याचं प्रमाण अत्यल्प आहे, त्या पार्श्‍वभूमीवर ही मालिका वेगळी ठरते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News