ठप्प झालेले उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी कृती आराखडा: सुभाष देसाई

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 15 April 2020
  • रेड झोन वगळून ग्रीन व ऑरेंज झोनमधील 29 जिल्ह्यांतील उद्योग सुरू करण्याबाबत निर्णय 

मुंबई : कोरोना संकटामुळे ठप्प झालेले उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी उद्योग विभागाने कृती आराखडा तयार केला असून तो लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला जाईल. त्यानंतर रेड झोन वगळून ग्रीन व ऑरेंज झोनमधील 29 जिल्ह्यांतील उद्योग सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीच्या (डिक्की) 15 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज डिक्कीच्या सर्व जिल्ह्यांतील सदस्य व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. या वेळी डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे, डिक्की वेस्ट इंडियाचे अध्यक्ष निश्‍चय शेळके, मुंबईचे उपाध्यक्ष पंकज साळवे यांच्यासह सुमारे 500 उद्योजक सहभागी झाले होते.

या वेळी लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योगांना कोरोनाच्या संकटामुळे येणाऱ्या अडचणींबाबत डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, निश्‍चय शेळके, संतोष कांबळे व पंकज साळवे आदींनी माहिती दिली. यात प्रामुख्याने उद्योगांना या संकटामुळे खेळत्या भांडवलाची कमतरता, आरबीआयने बॅंकांना तीन महिने ईएमआय भरण्यास अवधी दिला असला, तरी त्यावर चक्रवाढ व्याज आकारण्यात येणा आहे. त्यामुळे व्यावसायिक पुन्हा अडचणीत येतील असे मुद्दे मांडण्यात आले.

दरम्यान, देसाई म्हणाले, की राज्य शासन या संकटात उद्योजकांच्या पाठीशी उभे आहे. ग्रीन व ऑरेंज झोनमधील उद्योग सुरू करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. ग्रीन झोनमध्ये 15 जिल्हे येतात. केशरी झोनमध्ये 14 जिल्हे येतात. असे एकूण 29 जिल्ह्यांत उद्योग सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. उर्वरित लाल पट्ट्यात 12 महानगरपालिका येतात. त्या ठिकाणी लॉकडाऊन कडकपणे राबवले जाणार आहे.

कृषी मालावर प्रक्रिया करण्याचे काम निरंतर चालू राहिले पाहिजे. शेतकऱ्यांचा गावगाडा नियमित सुरू राहील. कीटकनाशके, अवजारे, उद्योग सुरू राहिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी उद्योगांना मोठ्या आर्थिक मदतीची गरज लागणार आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी एक बैठक घेतली जाईल. मुंबईत सर्व बॅंकांचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांची एक बैठक घेतली जाईल, असेही देसाई यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News