श्रवण कौशल्ये आत्मसात करताय?

ऋचा लाटकर
Thursday, 4 April 2019

श्रवण कौशल्य म्हणजे नक्की काय ?
अत्यंत सोप्या भाषेत सांगायचे झाले तर श्रवण कौशल्यामध्ये प्रामुख्याने हे करावे...

खरखर करणारा फोन कॉल, अत्यंत अशुद्ध भाषेतील लिखाण याचा योग्य तो अर्थ लावता न आल्याने खूप गैरसमज निर्माण होतात. आपली कामे शांतपणे आणि यशस्वी पार पाडण्यासाठी, भांडणे आणि गैरसमज टाळण्यासाठी, आपले म्हणणे समोरच्यापर्यंत नीट पोहोचवण्यासाठी संवाद कौशल्य हे खूप महत्त्वाचे आहे. याच संवाद कौशल्यातील उत्तम श्रवण कौशल्य हाही एक महत्त्वाचा भाग आहे.  लेखन, वाचन, बोलणे आणि ऐकणे या चार मूलभूत क्रियांमधील ऐकणे म्हणजेच श्रवणकला ही आपल्या शाळेच्या किंवा कोणत्याही अभ्यासक्रमात शिकविली जात नाही. ती सरावानेच आत्मसात केली जाते.

संवाद साधणे ही दुहेरी प्रक्रिया आहे, जेव्हा एकजण बोलत असतो तेव्हा दुसऱ्याने ते ऐकून घेऊन त्याला साजेशी प्रतिक्रिया देणे हे यशस्वी संवादाचे गमक आहे. हिअरिंग आणि लिसनिंग या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्या कानावर सतत वेगवेगळ्या ध्वनी लहरी आदळत असतात आणि आपला मेंदू त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे कानावर पडलेल्या गोष्टींचा अर्थ लावून ऐकणे म्हणजेच श्रवण करणे. उत्तम श्रोत्यांबरोबरच उत्तम वक्ता असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. 

श्रवण कौशल्य म्हणजे नक्की काय ?
अत्यंत सोप्या भाषेत सांगायचे झाले तर श्रवण कौशल्यामध्ये प्रामुख्याने  :

ऐकणे (हिअरिंग)
समोरची व्यक्ती किंवा वक्ता काय सांगत आहे हे ऐकून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणे. समोरचा जर झेब्रा या प्राण्याबद्दल बोलत असेल आणि त्याने असे सांगितले की झेब्रा या जातीतील प्रत्येक प्राणी हा वेगवेगळा दिसतो. हे वाक्‍य ऐकून जसेच्या तसे सांगणे म्हणजे हिअरिंग. 

समजून घेणे (अंडरस्टॅण्डिंग)
समोरच्याने सांगितलेली गोष्ट समजून घेऊन त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अंडरस्टॅण्डिंग. दोन झेब्रा एकसारखे दिसत नाहीत याचा अर्थ त्याच्या अंगावरील पट्टे वेगवेगळे असतात असा विचार करणे म्हणजे समजून घेणे.

आपले मत तयार करणे (जजिंग) : वक्‍त्याने सांगितलेल्या गोष्टीची पडताळणी करणे आणि स्वतःचे मत तयार करणे म्हणजे जजिंग. दोन झेब्रा एकसारखे दिसत नाहीत म्हणजेच त्यांच्या अंगावरचे पट्टे वेगवेगळे असतात, हे खरेच सत्य आहे का? याच्यावर विश्वास ठेवावा की हे सत्य पडताळून पाहण्यासाठी अजून काही करावे, असा विचार करणे म्हणजेच जजिंग.

उत्तम श्रवण कौशल्य आत्मसात 
करण्यासाठी काही गोष्टी 

समोरची व्यक्ती बोलत असताना त्याच्याकडे लक्ष केंद्रित करून ऐकणे. आजूबाजूच्या घडामोडींमुळे स्वतःचे चित्त विचलित होऊ देऊ नये, ऐकलेल्या वाक्‍याचा अर्थ लावून तो समजून घेणे महत्त्वाचे. अनेकदा आपण शरीराने त्या ठिकाणी असतो; पण मन दुसरीकडेच भरकटत असते. 

समोरच्या व्यक्तीचे अर्धवट ऐकून घेऊन त्यावर लगेच आपले मत बनवून व्यक्त होण्याची घाई प्रत्येकाला असते. ८० % वाद हे अशा अर्धवट ऐकण्यातून निर्माण होतात. समोरच्या व्यक्तीचे बोलणे पूर्ण ऐकून घेऊन मगच त्यावर स्वतःचे मत मांडण्याची सवय लावून घेणे महत्त्वाचे आहे. समोरचा बोलत असताना कागद पेन यांचे आवाज, टेबल वाजवणे अशा गोष्टी टाळाच. 

एखादा बोलत असताना त्याचे बोलणे मध्येच थांबवून आपला मुद्दा मांडणे टाळावे. यामुळे आपण त्याचे काहीही ऐकत नाही आहोत, असा गैरसमज होण्याची शक्‍यता असते. 

बोलणाऱ्याला प्रतिसाद देणेही तितकेच महत्त्वाचे. समोरच्याला मान हलवून, छोटीसी स्माईल देऊन योग्य तो प्रतिसाद द्यावा.

संभाषणातील एखादा मुद्दा कळला नसेल किंवा त्याबद्दल काही शंका असल्यास समोरच्याचे बोलणे पूर्ण झाल्यावर त्याबद्दल शंका विचारने हे एक ॲक्‍टिव्ह लिसनिंगचे उदाहरण आहे. 

सर्वात महत्त्वाचे एखाद्या मुद्द्यावर आपल्याला कितीही राग किंवा संताप येत असला तरी त्यावर प्रयत्नपूर्वक नियंत्रण ठेवले पाहिजे. आपण माणूस आहोत केमिकल नाही, त्यामुळे प्रत्येक ॲक्‍शनला रिॲक्‍शन दिलीच पाहिजे, असे नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News