प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत मन्मथचे नीट परीक्षेत यश 

मंगेश शेवाळकर
Friday, 7 June 2019
  • वडील विश्वनाथ साखरे यांना किडनीच्या आजाराने दोन वर्षापुर्वी निधन झाले
  • दोन आत्यांचाही किडनीच्या आजारानेच मृत्यू झाला
  • सर्वांचा खर्च मन्मथ याचे काका गंगाधर साखरे यांनी केला 
     

हिंगोली: वडील, आत्यांचा किडनीच्या आजाराने झालेला मृत्यू अन काकांची होणारी ससेहोलपट पाहून खचलेल्या मन्मथला काकांनी दिलेल्या हिंमतीने घडविले. डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या हयातनगर (ता.वसमत) येथील मन्मथ साखरे याने नीट परिक्षेत ५८८ गुण मिळवत पहिली पायरी पार केली आहे. 

वसमत तालुक्यातील हयातनगर येथे विश्वनाथ साखरे यांचे कुटुंब होते. घरी पाच एकर शेती, मात्र दुष्काळी परिस्थतीमुळे शेतीमधे उत्पन्न मिळत नव्हते. त्यातच मन्मथ हा तिसरी वर्गात असतांना त्याचे वडिल विश्वनाथ साखरे यांना किडनीचा आजार झाला. सुमारे सहा ते सात वर्ष डायलेसीसवर असलेल्या त्याच्या वडिलांचे दोन वर्षापुर्वी निधन झाले. तर दोन आत्यांचाही किडनीच्या आजारानेच मृत्यू झाला. या सर्वांचा खर्च मन्मथ याचे काका गंगाधर साखरे यांनी केला. 

मागील वीस वर्षात किडनीने आजारी असलेल्या भाऊ, बहिणीवर तब्बल ७५ लाख रुपये खर्च झाले. या शिवाय रुग्णालयात होणारा मानसीक व शारिरीक त्रास वेगळाच होता. या परिस्थितीमधे सर्व सामान्य रुग्णांचे काय हाल होतात हे ओळखून मन्मथ याने डॉक्टर होऊन गरजू रुग्णांची सेवा करण्याचे ठरविले. दहावी परीक्षेत नवोदय विद्यालयातून उत्तीर्ण झाल्यानंतर त्याचे काका गंगाधर साखरे यांनी त्यांना वसमत येथे आणले. त्यानंतर परिस्थितीची जाणीव करून देत जिद्द व परिश्रम केल्या शिवाय यश मिळत नाही हे पटवून दिले. 

आर्थिक पाठबळासोबतच मानसिक आधार देण्यास मी सक्षम आहे पण परिस्थितीशी दोन हात तुलाच करावे लागतील हे त्याच्या मनावर बिंबविले. त्यामुळे मन्मथने जिद्दीने आभ्यास करून बारावी परिक्षेत ८३ टक्के गुण मिळविले. बारावीच्या अभ्यासक्रमासोबतच त्याने नीट परिक्षेचा अभ्यासही सुरु केला. शिकवणी सोबतच दिवस रात्र एक करून त्याने नीटचा अभ्यास करून परिक्षा दिली.

७२० पैकी ५८८ गुण मिळविले. त्याची ऑल इंडिया रँक दहा हजार ७५५ असून राखीव संवर्गातील रँक तीन हजार ९२३ आहे. वैद्यकिय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेऊन गरजूंची सेवा करण्याचा पहिला टप्पा नीट परिक्षा उत्तीर्ण होऊ पार केला आहे. आता पुढे वैद्यकिय अभ्यासक्रम पूर्ण करून गरजू रुग्णांची सेवा करण्याचा मन्मथचा मानस आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News