नीट परिक्षेत यश मात्र वैद्यकीय शिक्षणासाठी मदतीची गरज

रामदास साबळे
Tuesday, 11 June 2019
  • तालुक्यातील आडस येथील लहानपणीच कु. अर्चना महादेव रोडगे हिचे पितृछत्र हरवले होते. 
  • निधनानंतर आईने लहान दोन्ही मुलांचा मोठ्या हिमतीने सांभाळ करत शिक्षण दिले. 
  • घरचा कमावता गेल्याने कुटूंब उघडल्यावर पडले होते.

केज: तालुक्यातील आडस येथील लहानपणीच कु. अर्चना महादेव रोडगे हिचे पितृछत्र हरवले होते. पती निधनानंतर आईने लहान दोन्ही मुलांचा मोठ्या हिमतीने सांभाळ करत शिक्षण दिले. घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची एक एकर जमीन यात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण होते. त्यामुळे कपडे शिऊन मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर कुटूंबाचा अर्थिक भार सांभाळत मुलांना शिक्षण दिले.

नुकत्याच लागलेल्या वैद्यकीय प्रवेशपुर्व (NEET) परिक्षेत अर्चनाने पाचशे सत्तावन्न गुण घेतल्याची बातमी समजताच  आईच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आपण आजवर केलेल्या कष्टाचे मुलीने चीज केल्याने त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहत होते.
     
सुखी संसाराचा गाडा सुरू असताना बारा वर्षांपूर्वी वडीलांचे निधन झाले. त्यावेळी अर्चना सहा वर्षांची तर मोठा भाऊ दुसरीच्या वर्गात शिकत होता. घरचा कमावता गेल्याने कुटूंब उघडल्यावर पडले होते. घरची एक एकर शेती त्यात कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण होते. पती निधनाने खचून न जाता मुलीला पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला.

घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने दोन्ही मुलांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी मुलास शिक्षणासाठी आजोळी ठेवले तर मुलीस गावीच आडस येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात प्रवेश दिला.  आर्चनाने दहावीच्या परीक्षेत नव्वद टक्के गुण घेतले. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी उक्कडगाव (ता.बार्शी, जिल्हा सोलापुर) येथील डॉ. चंद्रभान सोनवणे महाविद्यालयात प्रवेश दिला.

याठिकाणीची महागडी  फीस पडवरणारी नव्हती तरीही तिची शिक्षणाची तीव्र इच्छा पाहून तिथे प्रवेश दिला. बारावी विज्ञान शाखेतून तिने सत्याएंशी टक्के गुण घेतले; तर सहा जून रोजी जाहीर झालेल्या वैद्यकीय प्रवेशपुर्व (NEET) परीक्षेत ७२० पैकी ५५७ गुण मिळवून ती एम.बी.बी.एस. या वैद्यकीय शिक्षणास पात्र ठरली आहे. 

मुलगा विशालही बारावीनंतर आयटीआय करत आहे. दोन्ही मुलांना शिक्षण देण्यासाठी मात्र श्रीमती लता रोडगे यांना दिवस-रात्र शिलाई मशीनवर कपडे शिऊन शिक्षणाचा व कुटूंबाचा अर्थिक भार उचलताना मोठे कष्ट करावे लागले. मुलीने मिळविलेल्या यशाने या कष्टाचे चीज झाले आहे. आता खरी अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे ती वैद्यकीय शिक्षणासाठी लागणाऱ्या आरक्षणासाठी त्यासाठी लागणारा खर्च हा त्यांच्या आवाक्या बाहेरचा आहे. त्यामुळे तिचे पुढील शिक्षण कसे होणार ही चिंता त्यांना पडली आहे.

अशा परिस्थितीत या गुणी मुलीच्या शिक्षणासाठी सामाजिक भावनेतून मदतीचे हात पुढे येतील का? निश्चितपणे अशा गरीब विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाटचाल यशस्वीतेसाठी मदत करणाऱ्या दात्यांचे हात मदतीला धावून येऊन अर्चनाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

"पतीच्या निधनानंतर येणाऱ्या संकटाला सामोरं जात दोन्ही मुलांना शिक्षण दिले. मुलीने मिळविलेल्या यशाने मी केलेल्या कष्टाचे चीज झाले आहे."
-श्रीमती लता रोडगे

" शालेय जीवनापासूनच आईने शिक्षणासाठी बळ दिले. आईने जीवनभरं केलेल्या कष्टाला समोर ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्याने वैद्यकीय प्रवेशपुर्व परिक्षेत यश संपादन केले. वैद्यकीय शिक्षण पुर्ण करून समाजातील गरीब व गरजू रुग्णांची सेवा करणार आहे."
-कु.अर्चना रोडगे

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News