राज्यात लवकरच मेगा भरती तब्बल एक लाख रिक्त पदे भरण्यात येणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020

महाआयटीतर्फे खासगी एजन्सी नियुक्‍तीसह भरती प्रक्रियेचे नियोजन 

सोलापूर : फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या ७२ हजार जागांच्या महाभरतीत आणखी २९ हजार जागांची वाढ होणार आहे. दोन लाख रिक्‍त जागांपैकी ५० टक्‍के जागांच्या भरतीचा निर्णय वित्त विभागाने घेतला. त्यानुसार शासकीय विभागांमधील रिक्‍त पदांची माहिती नव्याने संकलित करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागातर्फे युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, भरती प्रक्रियेसाठी खासगी एजन्सी नियुक्‍ती झाल्यानंतरच महाभरतीला सुरुवात होईल, असे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

महापरीक्षा पोर्टल बंद केल्यानंतर आता महाआयटीच्या नियंत्रणात खासगी एजन्सीद्वारे महाभरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. पारदर्शक भरतीसाठी आयटी कंपन्यांमधील जागांची भरती करणाऱ्या सक्षम अशा संस्थेची नियुक्‍ती केली जाईल, असे महाआयटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तत्पूर्वी, शासनाच्या आठ विभागांसाठी महापरीक्षा पोर्टलकडे नोंदणी केलेल्या 34 लाख 83 हजार विद्यार्थ्यांचा डेटा माहिती व तंत्रज्ञान विभागाला सुपूर्त केला जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या महाभरतीत आता आरोग्य, शिक्षण, महसूल, गृह, कृषी, पशुसंवर्धन विभागांमधील पदांची भर पडली आहे. वर्ग-एक व वर्ग-दोनच्या अधिकाऱ्यांची भरती एमपीएससीमार्फत, तर वर्ग-तीन व वर्ग-चारच्या पदांची भरती खासगी एजन्सीद्वारे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अडीच महिन्यांत या महाभरतीला सुरुवात होणार असून, दिवाळीपूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे नियोजन आहे.

 

ठळक बाबी... 

महाआयटीतर्फे खासगी एजन्सी नियुक्‍तीसह भरती प्रक्रियेचे नियोजन 

महापरीक्षा पोर्टलकडील विद्यार्थ्यांचा डेटा माहिती व तंत्रज्ञान विभागाला देण्याची तयारी पूर्ण 

एकूण रिक्‍त जागांपैकी ५० टक्‍के जागा भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय 

रिक्‍त जागांची संख्या वाढल्याने आता एक लाख एक हजार जागांची होणार भरती 

भरती प्रक्रिया करणाऱ्या खासगी एजन्सीची क्षमता अन्‌ तांत्रिक समितीसाठी तज्ज्ञांची समिती

 

 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News