जिद्दीच्या जोरावर सुवर्णपदकासाठी अभयची उंच उडी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 13 January 2020

जिल्ह्यातल्या खेळाडूंमध्ये खूप ताकद आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील छोट्या- मोठ्या मैदानांवर असंख्य खेळाडू आपला घाम गाळत आहेत; परंतु त्यांना मार्गदर्शन मिळत नाही. यामुळे आपला खेळाडू मागे राहतो आहे, त्यांच्यामध्ये ती ऊर्जा निर्माण करा. जी राष्ट्रीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक देईल,

तळोदा :  आसाममध्ये गुवाहाटी येथे सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया‘ स्पर्धेत नंदुरबारच्या अभय गुरव याने उंच उडीत २.७ मीटर एवढी उंच उडी मारत सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. याअगोदर त्याला राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत कांस्यपदक मिळाले होते. ‘खेलो इंडिया’तून जिल्ह्याला मिळालेला हा मोठा बहुमान आहे.

अभयची खेळण्याची सुरवात खोंडामळी गावातून झाली. उंच उडी खेळात नैपुण्य दाखविताना जिल्हा, राज्य अशा अनेक स्पर्धा त्याने गाजविल्या. विजयवाडा येथे राष्ट्रीय ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत उंच उडी क्रीडाप्रकारात भारतात तिसरा येण्याचा मान त्याने पटकाविला होता, त्यावेळी त्याला कांस्यपदक  मिळाले होते.सध्या अभय इंडियन आर्मीत प्रशिक्षण घेत आहे.

परिस्थितीवर मात करत आपले करिअर खेळातून होईल, या उद्देशातून दिवस-रात्र फक्त प्रामाणिक मेहनत, खेळ, खेळ आणि खेळ या हिमतीवर अभयने संपूर्ण देशात नाव कोरले. आई नसल्याने आत्याकडे लहानाचा मोठा झालेला अभय असंख्य अडचणींवर मात करत यापर्यंत पोचला आहे. उत्पन्नाचे साधन म्हणून कामालासुद्धा जावे लागले. आपल्या जिल्ह्यात तुटपुंज्या व्यवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारच्या आधुनिक सरावाची व्यवस्था नाही.

यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय  व आबाजी स्पोर्टच्या पाठबळामुळे अभय भारतात ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत हे यश मिळवू शकला. या यशामागे डॉ. मयूर ठाकरे यांचा वाटा आहे. बिकट परिस्थितीत सराव करत असताना स्वतः डॉ. ठाकरे यांनी त्यातील गुण ओळखत त्याचा कसून सराव घेत त्याला मार्गदर्शन केले. 

अभयला कोणताही अनुभव नव्हता; परंतु मनात जिद्द, विविध राज्य संघटनांच्या स्पर्धांना जाऊन आलेला अनुभव यावर हे यश अभयने मिळविले आहे. खेळात पैसा हल्ली कमाई म्हणून बघितले जाते. मात्र, या क्लबमधील खेळाडूकडून फी घेत नाहीत, हे विशेष. मोफत क्रीडा प्रशिक्षण देऊन गरिबीमुळे मागे पडलेल्या खेळाडूंसाठी कार्य सुरूच आहे व यापुढेही सुरू राहील. यापेक्षाही मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत, असे मत क्रीडा क्षेत्रात व्यक्त होत आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News