आरे कॉलनीत देशातील पहिली ‘नाईट सफारी’

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019
  • १२० एकरवर साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणीसंग्रहालय

मुंबई - गोरेगाव येथील आरे वसाहतीमध्ये १२० एकर जमिनीवर साकारणाऱ्या  आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात देशातील पहिली ‘नाईट सफारी’ सुरू होणार आहे. याबाबत बुधवारी (ता. ५) महापालिका आणि राज्य सरकारचा वन विभाग यांच्यात सामंजस्य करार होईल. देशातील काही राष्ट्रीय उद्यानांत रात्रीच्या वेळी फेरफटका मारण्याची सोय आहे; मात्र अशी सुविधा असलेले हे देशातील पहिले प्राणिसंग्रहालय ठरणार आहे.

राज्य सरकारचा वन विभाग आणि मुंबई महापालिका यांच्या वतीने हा प्रकल्प राबवला जाईल. भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचा (राणीची बाग) विस्तार या ठिकाणी होणार आहे. 

या संदर्भात राज्य सरकारचा वन विभाग आणि मुंबई महापालिका यांच्यात बुधवारी सामंजस्य करार होणार आहे.  सामंजस्य करारानुसार राज्य सरकारकडून आरे वसाहतीमधील १२० एकर जमीन ९९ वर्षांसाठी फक्त एक रुपया वार्षिक भाड्याने प्राणिसंग्रहालय विकसित करण्यासाठी महापालिकेकडे हस्तांतरित केली जाईल.

या क्षेत्राचा मालकीहक्क राज्य सरकार आणि वन विभागाकडे राहील. जमीन मिळाल्यावर पाच वर्षांत प्राणिसंग्रहालय साकार होईल. प्राणिसंग्रहालयाची उभारणी, व्यवस्थापन, मनुष्यबळ, प्राणी-पक्ष्यांची आवक-जावक, त्यांची देखभाल आदी जबाबदारीही महापालिकेची असेल. 

प्राणी, पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे अभ्यासपूर्ण निरीक्षण करता यावे; शास्त्रीय माहितीद्वारे त्यांच्याबाबतचे गैरसमज दूर व्हावेत हा उद्देश आहे. प्राण्यांविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून प्राणिसंग्रहालयात सिंगापूरच्या धर्तीवर ‘नाईट सफारी’ सुविधा असेल. राज्याच्या सर्व भागांतील जैववैविध्य या प्राणिसंग्रहालयात दिसेल. त्यामुळे येथे वाघ, सिंह, हत्ती, साप, सुसर, मगर आदी प्राण्यांसह बेडूक, खेकडे,

फुलपाखरे आणि गवताळ
प्रदेशातील प्राणी नागरिकांना पाहता येतील, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

निसर्गशिक्षण केंद्र
शिक्षण आणि मनोरंजन या संकल्पनेनुसार हे प्राणिसंग्रहालय विकसित केले जाईल. वन्यजीवांच्या दुर्मीळ प्रजातींचे संरक्षण व संवर्धन केंद्र उभारणे हा उद्देश अाहेे. हे प्राणिसंग्रहालय म्हणजे शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक व पर्यटकांमध्ये निसर्ग, वन्यजीव आणि पर्यावरणाबाबत आवड व जागरुकता निर्माण करणारे निसर्गशिक्षण केंद्र असेल, असा विश्‍वास महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News