तो आणि ती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 22 May 2019

मग बघा लढण्यासाठी
त्याला किती बळ येतं
नवऱ्याचं मोठेपण हे 
किती जणांच्या लक्षात येतं ? 

नवरा म्हणजे समुद्राचा 
भरभक्कम काठ 
संसारात उभा राहतो
पाय रोवून ताठ      ll

कितीही येवो प्रपंच्यात
दुःखाच्या लाटा
तो मात्र शोधीत राहतो
सुखाच्या वाटा   ll    

सर्वांच्या कल्याणा करता
पोटतिडकीने बोलत राहतो
न पेलणारं ओझं सुद्धा 
डोक्यावर घेऊन चालत राहतो  ll

कधी कधी बायकोलाही
त्याचं दुःख कळत नसतं
आतल्या आत त्याचं मन 
मशाली सारखं जळत असतं  ll

नवरा आपल्या दुःखाचं 
कधीच प्रदर्शन मांडत नाही 
खूप काही बोलावसं वाटतं
पण कुणाला सांगत नाही   ll

बायकोचं मन हळवं आहे
याची नवऱ्याला जाणीव असते 
दुःख समजून न घेण्याची 
अनेक बायकात उणीव असते  ll

सारं काही कळत असून
नवऱ्याला अपमान गिळावे लागतात 
वेदनांना काळजात दाबून
पुन्हा कष्ट उपसावे लागतात    ll

सगळ्यांच्या आवडी जपता जपता 
मन मारीत जगत असतो 
बायको , पोरं खूष होताच
तो सुखी होत असतो  ll

इकडे आड तिकडे विहीर 
तशीच बायको आणि आई 
वाट्टेल तसा त्रास देतात 
कुणालाच माया येत नाही ll

त्याने थोडी हौसमौज केली तर
धुसफूस धुसफूस करू नका
नवऱ्या विरुद्ध विनाकारण
दारू गोळा भरू नका  ll

दोस्ता जवळ आपलं मन
त्यालाही मोकळं करावं वाटतं
हातात हात घेऊन कधी
जोर जोरात रडावं वाटतं ll

समजू नका नवरा म्हणजे
नर्मदेचा गोटा आहे
पुरुषाला काळीज नसतं
हा सिद्धांत खोटा आहे  ll

मी म्हणून टिकले इथं
दुसरी पळून गेली असती
बायकोनं विनाकारण
नवऱ्याला धमकी दिलेली असती ll

घरात तुमचं लक्षच नाही
हा एक उगीच आरोप असतो
बाहेर डरकाळ्या फोडणारा
घरी म्यांव म्यांव करीत बसतो ll

सारख्या सारख्या किरकिरीनं
त्याचं डोकं बधिर होतं
तडका फडकी बाहेर जाण्यास
खूप खूप अधीर होतं  ll

घरी जायचं असं म्हणताच
त्याच्या पोटात गोळा येतो
घरात जाऊन बसल्या बसल्या
तोंडात आपोआप बोळा येतो ll

नवरा म्हणा , वडील म्हणा
कधी कुणाला कळतात का ?
त्यांच्या साठी कधी तरी 
कुणाची आसवं गळतात का ? ll 

पेला भर पाणी सुद्धा
चटकन कुणी देत नाही 
कितीही पाय दुखले तरी 
मनावर कुणी घेत नाही  ll

वेदनांना कुशीत घेऊन 
ओठ शिउन ' तो ' पडून राहतो 
सर्वांच्या सुखासाठी 
एकतारी भजन गातो  ll

बायको आणि मुलांनी 
या संताला समजून घ्यावं
फार काही नकोय त्याला 
दोन थेंब सुख द्यावं    ll

मग बघा लढण्यासाठी
त्याला किती बळ येतं
नवऱ्याचं मोठेपण हे 
किती जणांच्या लक्षात येतं ? ll

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News