72 वा वर्धापनदिन: एसटीला मिळाली नवसंजीवनी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 June 2020

परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ऍड. अनिल परब यांनी माहिती

मुंबई : सोमवारी (ता. 1) जून रोजी एसटीचा 72 वा वर्धापनदिन आहे. 1 जून 1948 रोजी पुणे- अहमदनगर मार्गावर आपली पहिली एसटी धावली होती. त्यानिमित्ताने गेली अनेक वर्षे सातत्याने तोटा सहन करणाऱ्या एसटीला मालवाहतुकीच्या रूपाने नवसंजीवनी मिळाली आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ऍड. अनिल परब यांनी व्यक्त केले.

राज्य शासनाने 18 मे रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार एसटी महामंडळ आपल्या बसमधून व्यावसायिक स्वरूपात माल वाहतूक करू शकते, त्यासाठी आवश्‍यकता असल्यास जुन्या एसटी बसमध्ये आवश्‍यक ते बदल करून त्यांचे रूपांतर मालवाहू वाहनांत करून त्याद्वारे ही मालवाहतूक करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सध्या एसटीकडे स्वतःची 300 मालवाहू वाहने उपलब्ध आहेत. त्याद्वारे मालवाहतूक सुरू करण्यात येत असून त्याचा शुभारंभ रत्नागिरी येथून आंब्याच्या पेट्या बोरिवलीला पाठवून करण्यात आला.

एसटीचा विस्तार पाठबळ देणारा

एसटी महामंडळाचे राज्यात 250 आगार आहेत. जवळजवळ प्रत्येक तालुका स्तरावर हे आगार कार्यरत आहेत. याबरोबर 31 विभागीय कार्यालये, 33 विभागीय कार्यशाळा, असा मोठा विस्तार असून तो भविष्यात एसटीच्या मालवाहतुकीला पाठबळ देणारा आहे.

सहा दिवसांत 41 ट्रक मालवाहतुकीसाठी नोंद

सध्या प्रत्येक जिल्हा स्तरावर एसटीने मालवाहतुकीचे स्वतंत्र कक्ष निर्माण केले असून त्यांच्यामार्फत एमआयडीसी, कारखानदार, लघुद्योजक, कृषिजन्य व्यापारी यांच्या भेटी-गाठी घेऊन एसटीच्या मालवाहतुकीबाबत माहिती दिली जात आहे. यामध्ये शासनाची अनेक महामंडळे, व्यापार मंडळे आपला माल एसटीच्या सेवेतून पाठवण्यास उत्सुक आहेत. गेल्या सहा दिवसांत राज्यभरात 41 ट्रक मालवाहतुकीसाठी नोंदणी झाली आहे.

पुणे, नाशिक, सातारा, सांगली, जळगाव व गडचिरोली या जिल्ह्यांनी मालवाहतुकीच्या क्षेत्रात सध्या चांगली आघाडी घेतली आहे. माफक दर, सुरक्षित व नियमित सेवेमुळे एसटीच्या मालवाहतुकीला भविष्यात चांगला प्रतिसाद मिळेल.
- शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News