पुढील ८ महिन्यांत रुग्णांची संख्या ६.१८ कोटींवर...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 July 2020
  • देशात कोव्हिड बाधितांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. हे प्रमाण असेच राहिल्यास पुढील महिन्यांत म्हणजे मार्च २०२१ पर्यंत देशात कोरोना बाधितांचा आकडा ६.१८ कोटी पर्यंत जाईल; तर २८ लाख रुग्णांचा मृत्यू होणार असल्याचा इशारा भारतीय विज्ञान संस्थेने दिला आहे.
  • संस्थेच्या अंदाजानुसार येत्या नोव्हेंबरपर्यंत देशातील बाधित रुग्णांचा आकडा कोटी २० लाखांच्या वर जाईल; तर लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू होईल.

मुंबई :-  देशात कोव्हिड बाधितांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. हे प्रमाण असेच राहिल्यास पुढील ८ महिन्यांत म्हणजे मार्च २०२१ पर्यंत देशात कोरोना बाधितांचा आकडा ६.१८ कोटी पर्यंत जाईल; तर २८ लाख रुग्णांचा मृत्यू होणार असल्याचा इशारा भारतीय विज्ञान संस्थेने दिला आहे. संस्थेच्या अंदाजानुसार येत्या नोव्हेंबरपर्यंत देशातील बाधित रुग्णांचा आकडा १ कोटी २० लाखांच्या वर जाईल; तर ५ लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू होईल.

जानेवारीत परिस्थिती गंभीर झाल्यास रुग्णांचा आकडा २  कोटी ४० लाखांच्या वर जाईल; तर मृत्यू १२ लाखांच्यावर जाण्याची शक्‍यता आहे. या दरम्यान महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ६.३ लाखांवर जाईल; तर दिल्लीत १.६  लाख कोरोना बाधित आढळतील. तामिळनाडूत १.८ लाख, गुजरातमध्ये ६१ हजार रुग्ण सापडतील, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.

१ सप्टेंबरपर्यंत देशात कोरोनामुळे १.४ लाख लोकांचा मृत्यू होईल. यात सर्वाधिक २५  हजार मृत्यू एकट्या महाराष्ट्रात; तर दिल्लीत ९७००, तामिळनाडूत ६३००, कर्नाटकमध्ये ८५००; तर गुजरातमध्ये ८५०० मृत्यू होतील, असा अंदाज विज्ञान संस्थेने वर्तवला आहे.  २३  मे ते १८  जून या दरम्यान कोरोना संसर्गाच्या आकडेवारीचा अभ्यास करून भारतीय विज्ञान संस्थेने हा अंदाज व्यक्त केला आहे; मात्र सध्या कोव्हिड १९  संसर्गाचे प्रमाण आणि परिस्थिती बघता हा अंदाज चुकू शकतो, असेही संस्थेने स्पष्ट केले आहे.

... तर कोरोना नियंत्रणात

आठवड्यात दोन ते तीन दिवसांचे लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन केल्यास संसर्गाचे प्रमाण कमी होऊ शकते, असे विज्ञान संस्थेने म्हटले आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. यामध्ये अधिक सुधारणा केल्या पाहिजेत. चांगले उपचार, वेळेवर विलगीकरणाच्या सुधारणांची गरज आहे. अद्याप कोरोनावर लस न आल्यामुळे आजारावर मात करण्यासाठी हे चांगले पर्याय असल्याचे भारतीय विज्ञान संस्थेने म्हटले आहे.

२४ तासांत ३३ हजार रुग्ण

गेल्या २४ तासांत देशात ३२,६९५  नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत; तर ६०६ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या  ९,६८,८७६ एवढी झाली आहे. आतापर्यंत ६,१२,८१५  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत; तर  २४,९१५  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News