लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ५० टक्के उमेदवारांची दांडी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019
  • ६ हजार २४८ विद्यार्थी राहिले गैरहजर
  • शहरातील २४ केंद्रांवर दोन सत्रांमध्ये ही परीक्षा पार पडली.
  • परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. 

औरंगाबाद - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत तब्बल पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दांडी मारली. शहरातील २४ केंद्रांवर दोन सत्रांमध्ये ही परीक्षा पार पडली. परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. 

भारतीय प्रशासन सेवा (आयएसएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अशा सुपर क्‍लासवन पदासाठी ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या माध्यमातून ९८६ पदे भरली जाणार असल्याने उमेदवारांनी जोरदार तयारी केली होती. मौलाना आझाद महाविद्यालय, वसंतराव नाईक, पीईएस, मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, पोदार इंटरनॅशनल स्कूल, चाटे स्कूल, पीईएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, एसबीओए, सेंट झेवियर्स, स.भु. कला व वाणिज्य महाविद्यालय, नवखंडा महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, देवगिरी महाविद्यालय, होलिक्रॉस, शिवछत्रपती महाविद्यालय, शासकीय कला, विज्ञान महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, स.भु. विज्ञान महाविद्यालय, वेणूताई चव्हाण कन्या प्रशाला, एमजीएम पॉलिटेक्‍निक, बळीराम पाटील विद्यालय, जेएनईसी महाविद्यालय, संत मीरा कनिष्ठ महाविद्यालय, मुकुल मंदिर हायस्कूल, सुशीलादेवी देशमुख स्कूल, सेंट फ्रान्सिस हायस्कूल, मिलिंद कला महाविद्यालयात या परीक्षेचे केंद्र होते.

औरंगाबादसह मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी हजेरी लावली होती. पहिल्या सत्रासाठी ११ हजार ७१७ विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ५५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये सहा हजार १३६ विद्यार्थी गैरहजर असल्याने उपस्थितांची टक्केवारी ४७.४० टक्के इतकी होती. दुसऱ्या सत्रामध्ये नोंदणी केलेल्या ११ हजार ७१७ विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ४६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील ६ हजार २४८ विद्यार्थी गैरहजर होते. पहिल्या सत्रातील पेपर अवघड गेल्याने काही उमेदवारांनी दुसरा पेपर देण्याचा प्रयत्नही केला नसल्याचे दिसून आले.

दरम्यान, परीक्षेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी यांच्याशिवाय परीक्षा केंद्र परिसरात कोणालाही प्रवेश देण्यात येत नव्हता. परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रात प्रवेश करताना सोबत कॅल्क्‍युलेटर, मोबाईल फोन किंवा कोणत्याही प्रकारचे इलेक्‍ट्रॉनिक साधन नेण्यास मनाई करण्यात आल्याने ज्यांनी असे सामान आणले होते त्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. सोबत आलेल्या नातेवाइकांकडे अथवा वाहनांच्या डिक्कीमध्ये वस्तू ठेवण्याची नामुष्की परीक्षार्थींवर ओढवली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News