सार्वजनिक मंडळांसाठी 4 फुटांची मूर्तीची अट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 25 July 2020

गणरायाच्या आराधनेच्या उत्सवाला अवघा महिना राहिला असल्याने मूर्तिकारांची अक्षरश: घड्याळाबरोबर स्पर्धा सुरू आहे

मुंबई : गणरायाच्या आराधनेच्या उत्सवाला अवघा महिना राहिला असल्याने मूर्तिकारांची अक्षरश: घड्याळाबरोबर स्पर्धा सुरू आहे. गणेशोत्सवाबाबत शासन दरबारी निर्णय घेण्यास झालेला विलंब आणि त्यानंतर पालिकेकडून उशिराने मिळालेली परवानगी, यामुळे यंदा मूर्तिकारांना मागणीपेक्षा निम्म्या गणेशमूर्तीही तयार करता येणार नाही.

सार्वजनिक मंडळांसाठी 4 फुटांची मूर्तीची अट सरकारने केली आहे; तर घरगुती मूर्ती 2 फुटांपर्यंत असावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. मात्र, मूर्तीची उंची ठरविण्यासाठी एवढा विलंब का झाला, असा प्रश्‍न मूर्तिकार उपस्थित करतात. त्यातच आठवडाभरापूर्वी पालिकेने मंडप बांधण्यास परवानगी दिली. शाडूच्या मातीची मूर्ती बनवायची, तर किमान 4-5 दिवस लागतात. गणेशोत्सव 20 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. एवढ्या काळात मूर्ती किती बनवणार, असा पेच मूर्तिकारांसमोर उभा आहे.

मुंबईत साधारण दीड लाखाहून अधिक घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना होते. त्यातील लाखभर मूर्ती मुंबईतील मूर्तिकार घडवतात. मात्र, यंदा 50 टक्केही काम होईल याची खात्री मूर्तिकारांना नाही.

शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात गुजरातहून माती मागवली. 100 टन माती मुंबईत आली. तेव्हापासून ती मूर्तिकारांच्या कारखान्यात, घरात पडून आहे. त्याच वेळी कारखान्यांसाठी मंडप बांधण्याची परवानगी मागितली जात होती. मात्र, पालिकेकडून कोणाताही निर्णय झाला नाही, असेही सांगण्यात आले.

काही मूर्तिकारांची माती भिजून कडक झाली आहे. मूर्ती घडवायची असल्यास माती लोण्याप्रमाणे मऊ करावी लागते. ही कडक माती मऊ करण्यासाठीच बराच वेळ खर्च होत आहे. ओल्या मातीची मूर्ती बनवणेही अवघड असल्याचे मूर्तिकार सांगतात.

गणेशोत्सवाबाबत जूनच्या सुरुवातीलाच निर्णय घेणे गरजेचे होते. मूर्तिकारांना जूनच्या पहिल्या पंधरावड्यात मंडप बांधण्याची परवानगी मिळाली असती तरी बऱ्यापैकी प्रश्‍न सुटला असता. मात्र, आता कमी वेळेत मूर्ती तयार होणे अवघड झाले आहे.
- गणेश तोंडवलकर, अध्यक्ष, मुंबई मूर्तिकार संघटना.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News