सेवा करताना ३० भाजप कार्यकर्त्यांचा कोरोनामुळे मृत्यू : आमदार मंगलप्रभात लोढा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 July 2020
  • कोरोनाच्या काळात सेवा करताना मुंबईत भाजपचे ३० कार्यकर्ते कोरोनामुळे मृत्यू पावले.
  • सेवाकार्यात जनकल्याण समिती, सेवांकुर, निरामय फाऊंडेशन, स्वामीनारायण संप्रदाय, अनिरुद्ध बापूंची संस्था, नानासाहेब धर्माधिकारींची संस्था, पांडुरंगशास्त्री आठवलेंची संस्था, नरेंद्र महाराजांचा संप्रदाय, रोटरी आणि लायन्स क्‍लबचे लोक, राजचंद्रजी संस्थान, जियो जीतो संस्था तसेच अनेक जैन संघटना आहेत.

मुंबई :- कोरोनाच्या काळात सेवा करताना मुंबईत भाजपचे ३० कार्यकर्ते कोरोनामुळे मृत्यू पावले. सेवाकार्यात जनकल्याण समिती, सेवांकुर, निरामय फाऊंडेशन, स्वामीनारायण संप्रदाय, अनिरुद्ध बापूंची संस्था, नानासाहेब धर्माधिकारींची संस्था, पांडुरंगशास्त्री आठवलेंची संस्था, नरेंद्र महाराजांचा संप्रदाय, रोटरी आणि लायन्स क्‍लबचे लोक, राजचंद्रजी संस्थान, जियो जीतो संस्था तसेच अनेक जैन संघटना आहेत. मुंबईत संघाच्या स्वयंसेवकांनी जवळपास एक लाख बावीस हजार नागरिकांचे स्क्रिनिंग पूर्ण केले आहे. या संस्थांच्या कामाचे श्रेय त्यांना मिळालेच पाहिजे, असे मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे.

 धारावी कोरोनामुक्त करण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचा वाटा आहे का, या वादात मंगलप्रभात लोढा यांनीही संघाची बाजू घेतली असून दुसऱ्याचे श्रेय लपवणे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही, अशी आठवण त्यांनी करून दिली आहे. समाजसेवा नि:स्वार्थच असली पाहिजे, असे संस्कार स्वयंसेवकांना देणारा राष्ट्रीय स्वयंम सेवक संघ श्रेयाचा विचार कधीच करत नाही; परंतु मदतकार्यात हातभार लागलेल्या सर्वांचे कौतुक करणे, दखल घेणे हे सरकारचे काम आहे. ज्याचे श्रेय त्याला दिल्यानेच सरकारची आणि राजकारण्यांची विश्‍वासार्हता वाढते. तसे झाले तर सरकार आणि स्वयंसेवी संस्था यांच्यातील हा परस्पर विश्‍वासाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असेही लोढा यांनी सांगितले आहे.

लॉकडाऊनमध्ये अनेक दिवस धारावीत गोंधळाची अवस्था होती. धारावीतील कोरोनाचा उद्रेक रोखण्याकरता घरोघरी जाऊन शेवटच्या व्यक्तीपर्यंत "जनतपासणी' करणे आवश्‍यक होते. प्रशासनावर आधीच प्रचंड ताण होता. अशावेळी संघासह अनेक एनजीओ या धोकादायक कार्यात प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून उतरल्या. निरामयसेवा फाऊंडेशनमार्फत आलेल्या ५१ डॉक्‍टरांना मदतनीस म्हणून रा. स्व. संघाचे तंदुरुस्त आणि तरुण ५१२ स्वयंसेवक तेथे आले. या मोहिमेत ७ जून रोजी दहा हजाराहून अधिक धारावीकरांची तपासणी झाली. मी स्वतः त्या दिवशी धारावीत उपस्थित होतो. त्यावेळी भारावलेल्या धारावीकरांनी डॉक्‍टरांवर पुष्पवृष्टी केली, रहिवाशांनी दिलेला चहा पिणे या डॉक्‍टरांना पीपीई किटमुळे शक्‍य झाले नाही, अशीही आठवण लोढा यांनी सांगितली.

संघ श्रेयासाठी काम करत नाही
 

राज्य कोरोनाच्या विळख्यात असताना दाट लोकवस्तीची धारावी कोरोनामुक्त करणे हे सोपे काम नव्हते. या कामात अनेक सामाजिक, धार्मिक संस्थांची मदत झाली आहे. केवळ मुंबईतच नव्हे तर देशभरातच या कोरोना संकटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व शक्तिनिशी मदत कार्य करत आहे. ही मंडळी कधीही श्रेयासाठी काम करत नाहीत हे नक्की; परंतु दुसऱ्याचे श्रेय लपविण्याची महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कधीच नव्हती, याचेही भान सर्वांनी राखले पाहिजे, असे लोढा म्हणाले आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News