राजं जरा मन मोकळं करावंस वाटतंय...

आकाश गायकवाड
Saturday, 22 February 2020

शिवजयंतीच्या निमित्ताने दोन - तीन ठिकाणी कार्यक्रमासाठी गेलो होतो. राजांची जयंती म्हणजे त्यांचे विचार समर्थपणे पुढे नेणारी आमची पिढी आहे. 

जालना : शिवजयंतीच्या निमित्ताने दोन - तीन ठिकाणी कार्यक्रमासाठी गेलो होतो. राजांची जयंती म्हणजे त्यांचे विचार समर्थपणे पुढे नेणारी आमची पिढी आहे. असं वाटलं होत पण, घडतंय सगळं विपरीतच. कुणाला सांगावे काही कळेना मग काय थेट शिवाजी महाराजांना हाक दिली. त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या आणि माझं अस्वस्थ झालेलं मन महाराजांजवळ मोकळं केल.

राजे तुमची जयंती झाली. कधी नव्हे ते तरुणाई कामाला लागली. ३३ कोटी देवालाही लाजवेल असे काम आमची तरुणाई करू लागली. तुम्हाला देवत्त्व देऊन सळसळत्या रक्ताची तरुणाई जवाबदारी पासून मुक्त झाली. तुम्हाला देव केलं म्हणजे काय केलं? तर शिवाजी महाराजांसारखं वागण्याची जवाबदारी आपल्यावर नसल्याची जाणीव त्यांनी करून दिली. तुम्ही देव असल्यामुळे वर्षातून एकदा 'शिवाजी महाराज की जय' म्हणायचं, जयंती साजरी करायची, वर्गणी जमा करायची, थोडी खर्चायची आणि जास्त खायची? कपळाला अष्टगंधाची चंद्र कोर लावायची, गुलाल उधळायचा अन् डीजेच्या तालावर ठेका धरला की आमचं कामच झाल, असं समजून जबाबदारी पासून मुक्त व्हायच. 

तुमची जयंती आली की, आम्ही गावभर झेंडे लावले, आम्ही बाईक रॅली काढली, किक मारली ट्रिपल सीट बसून गावभर बोंबलत हिंडलो. भाषणे तर अशी ठोकली की नुसता टाळ्याचा गडगडाट, पुन्हा घोषनांचा पाऊस अंगावर शहारे येत होते. पण इथे ही जरा तुमच्या विचारांची पायमल्लीच झाली. पावसाळा लागला की, बेडकं जसे बाहेर निघतात तसंच राजाची जयंती आली की, स्वयंघोषित शिवभक्तांचा जणू महापुरच येतो. प्रत्यक्षात तुमच्या विचारांना अप्रत्यक्ष बगल देत नुसते स्टेट्स टाकून आम्ही शिवभक्त झालो; पण मनातून शिवकार्य करण्याची कोणाची इच्छाच उरली नाही.

महाराज तुम्हाला सांगायला एवढंच पुरेसं नाही हो..! अगदी उर भरून यायचा तुमचा पराक्रम एकूण आणि वाचून. महाराष्ट्रात जन्मल्याचा आम्हाला अभिमानच नाही तर गर्व आहे. तुमच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्य भूमीत काय काय घडत आहे, याची जाणीव तुम्हाला आहेच. पण माझ्या मनात दाटून आलेल्या अन्याय अत्याचारांच्या बांधाला वाट कशी मोकळी करून देऊ असं वाटलं म्हणून तुमच्या जवळच मन मोकळं करतोय महाराज...

तुमच्या स्वराज्यात आया, बहिणींना आरक्षण नव्हतं; पण त्या शंभर टक्के सुरक्षित होत्या. कोणी यावं अन् झाड पाला ओरबाडून न्याव तशी लेकी बाळीची अब्रू वेशीला टांगली जात आहे. पेट्रोल, ऍसिड टाकून मारून टाकावं एवढं स्वस्त मरण झालंय का आमच्या लेकीचं?  तुमच्या नावानं मतांची भीक मागणाऱ्या, तुमच्या आशीर्वादाने निवडून येणाऱ्या, तुमचा फोटो बॅनरवर असल्याशिवाय ज्यांच पानसुद्धा हालत नाही अशा राजकीय पुढाऱ्यांनी तुमच्या स्वप्नातले स्वराज्य उभे करण्यासाठी का प्रयत्न करू नये? शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात न लावू देणारे तुम्ही. आज त्याच महाराष्ट्रात राजकीय पुढाऱ्यांच्या आश्वासनाने बळीराजा होरपळून निघतोय. त्याला पिकवायचा अधिकार आहे मात्र विकायचा अधिकार दिलाच नाही. कर्जाचा डोंगर, मुलींचे लग्न, सावकारांची कटकट, बियाणं खतांची उधारी, मुलांचे शिक्षण एवढ्या डोंगराचा पेटारा थोडा की काय म्हणून अस्मानी, सुलतानी संकटांनी पार खचून जातोय. महाराज बळीराजा. एवढं सगळं करून त्याच्या हाती काय तर फाशीचा दोरखंड, विषारी औषधाची बाटली बस्स...

त्याचा जीव गेल्यावर देखील ही दळभद्री व्यवस्था त्याला सुखानं मरू देत नाही. तुम्ही ज्या मावळ्यांना घेऊन स्वराज्य उभं केल. आज तसे मावळे घडत नसल्याचे दुःख आहे. फक्त तुमची जयंती आली की, गाड्याला झेंडे लावून गावभर बोंबलत हिंडायच, वाट्टेल ते व्यसन करायच, बापाच्या जीवावर मोठं व्हायच अन् त्याच बापाचा अपमान करणारी पिढी इथं जन्माला आली आणि येत आहे. कुठे ते तुमच्या स्वराज्याचे मावळे आणि कुठे हे आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे डोमकावळे..

महाराज आम्हाला माफ करा. आम्ही पुन्हा एकदा तानाजी, जिवाजी, येसाजी, संताजी, धनाजी, हंबीर मामा निर्माण नाही करू शकलो. तुम्ही पुन्हा जन्माला यावं असा हा महाराष्ट्र राहिला नाही. शिवाय तुमच्या विचारांची जयंती साजरी करावी असे मस्तक उरले नाही. इथे जो बोलतो त्याचा पानसरे, दाभोळकर केला जातो. तुम्हाला एकच सांगणं आहे, महाराज, तुम्ही पुन्हा जन्माला यायच्या आधी विचार करा. कारण हे फितुरांच राज्य आहे. इथले मावळे निष्ठावंत तर नाहीच पण रयत ही स्वार्थी झाली आहे. महाराज....!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News