लातूरात तरुणींना स्वसंरक्षणाचे धडे; मुली बनताहेत धाडसी

सुशांत सांगवे, लातूर
Monday, 23 December 2019

अशिहरा आणि यशोदीप सेवाभावी संस्थेचा पुढाकार

लातूर : कोणी छेड काढली तर त्याला विरोध कसा दर्शवायचा? कोणी अतिप्रसंग करत असेल तर न घाबरता त्याचा प्रतिकार कसा करायचा? चाकू-बंदूक असे शस्त्र कोणी समोर रोखले तर त्याच्यावरच हल्ला कसा करायचा? अशा अनेक टिप्स केवळ तोंडी नव्हे तर प्रात्यक्षिक करून दाखवत लातूरच्या महाविद्यालयीन मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहेत. यातून विद्यार्थिनी धाडसी होताना पहायला मिळत आहे.

हैदराबाद येथे झालेल्या दिशा अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर लातुरातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींना गेल्या काही दिवसांपासून मोफत स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहेत. सशस्त्र हल्ला, निशस्त्र प्रतिकार, कराटे, लाठी-काठी याबाबतचे प्रात्यक्षिक करून दाखवले जात आहेत. हल्ला झाला तर प्रतिकार कसा करायचा, याच्या टिप्सही दिल्या जात आहेत. या उपक्रमासाठी यशोदीप बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अशिहरा कराटे असोसिएशनने पुढाकार घेतला असून दीडशेहून अधिक विद्यार्थिनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या आहेत. त्यांना के. वाय. पटवेकर हे प्रशिक्षण देत आहेत.

यशोदीप संस्थेच्या सचिव मीना भोसले म्हणाल्या, महिला आणि मुली यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. छेडछाडीचे, अत्याचाराचे प्रकार वाढत आहेत. अशा घटना घडल्यानंतर आपण हळहळ व्यक्त करतो. मोर्चे काढतो. कॅन्डल मार्च काढतो, पण या पलिकडे जाऊन आम्ही मुलींना आत्मनिर्भर कसे बनवता येईल, या दृष्टीकोनातून या उपक्रमाचे आयोजन केले आहे. मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावरून त्यांनाही आपण धाडसी बनावे, असे वाटत आहे, हे दिसून येत आहे. स्वसंरक्षणाचे धडे देण्याबरोबरच पोलिस आणि कायदेतज्ञांकडून महिला संरक्षक विषक कायद्याची माहिती, आरोग्य तज्ज्ञांकडून उत्तम आरोग्याची माहितीही मुलींना देत आहोत. या वेळी प्राजक्ता भोसले, शोभा कोंडेकर उपस्थित होत्या. हे शिबिर दयानंद महाविद्यालयात २१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

या आहेत टिप्स
- कोणी मागून घट्ट पकडले तर खाली वाकून मागच्याचे पाय पुढे ओढा
- गळ्याला पकडले तर हाताच्या तळव्याने हणूनवटी जोरात फटका मारा
- चाकू, बंदूक रोखला तर समोरच्याचा हाताच्या नसा दाबा
- पेन, पेन्सिलसारख्या टोकदार वस्तू जवळ ठेवा. छेडछाडीवेळी त्याचा वापर करा
- हल्लेखोराच्या तोंड, नाक-डोळ्यावर न घाबरता हल्ला करा

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News