लातूर : पानिपतच्या युद्धाला खऱ्या अर्थाने जिथून सुरवात झाली, अशा दैदिप्यमान इतिहासाची साक्ष असलेल्या उदगीरच्या भुईकोट किल्ल्याची सध्या दुरावस्था झाली आहे. किल्ल्यात अनेक ठिकाणी पडझड पहायला मिळत आहे. तरीसुद्धा राज्य सरकारच्या गड-किल्ले संवर्धन योजनेच्या यादीत या किल्ल्याचा समावेश नाही, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे इतिहासप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण आहे. इतिहासाच्या पाऊलखुणा नष्ट होण्याआधी या किल्ल्याचे संवर्धन व्हावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा ‘पानिपत’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सुरवात लातूर जिल्ह्यातील उदगीरमधील भुईकोट किल्ल्यापासून झाली आहे. या पार्श्वभूमीवर, 'सकाळ'ने या किल्ल्याची पाहणी केली. किल्ल्याची होत असलेली पडझड, कंबरेइतक्या गवताने व्यापलेला परिसर, दुर्गंधी-अस्वच्छता, प्रेमवीरांनी भिंतीवर कोळशाने काढलेल्या आक्षेपार्ह 'नक्षी', किल्ल्यात फिरणारी मोकाट जनावरे, हे वास्तव चित्र या पाहाणीतून समोर आले.
उदगीर येथे एकमेव महत्वाची लढाई ३ फेब्रुवारी १७६० रोजी मराठे व निजाम यांच्यात झाली. त्या लढाईचे नेतृत्व सदाशिवराव (भाऊ) पेशवे यांनी केले होते. त्यांनी या लढाईत निजामाचा पराभव केला. त्यामुळेच पानिपतच्या युध्दाचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपवण्यात आले. म्हणूनच उदगीरमधील या किल्ल्याला इतिहासात वेगळे महत्व आहे.
बरीदशाहीच्या अस्तानंतर उदगीरच्या किल्ल्यावर आदिलशाही, मुघल, मराठे व शेवटी निजामाची सत्ता होती, या घटनाही विशेष महत्वाच्या आहेत. पण हा इतिहास या किल्ल्यावर आल्यानंतर पर्यटकांना सांगितला जात नाही. तसे फलकही या किल्ल्यावर उभारले गेले नाहीत. येथील शिलालेखांचा अर्थ सांगितला गेला नाही. तटबंदी आणि बुरूजांवर झाडे उगवली आहेत. त्यामुळे भिंती हळूहळू खिळखिळ्या होऊ लागल्या आहेत. काही भाग तर अक्षरश: कोसळलाही आहे.
किल्ल्याच्या आत चारही बाजूला मोठ्या प्रमाणात गवत उगवले आहे. त्यामुळे किल्ल्याचा आतील भाग गवतात आणि झुडपात हरवला आहे, असेच दिसते. या भागातील काही नागरिक किल्ल्यात बिनदिक्कतपणे आपली जनावरे सोडतात. वाढलेल्या गवतामुळे, वाढत्या अस्वच्छतेमुळे आणि दुर्गंधीमुळे इच्छा असूनही अनेक पर्यटक किल्ल्याकडे फिरकत नाहीत. गवतामुळे पायवाटा गायब झाल्या आहेत. किल्ल्याजवळ विद्यूत पुरवठा नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. बसण्याची व्यवस्था नाही. पायऱ्या आणि अंतर्गत रस्ते उखडलेल्या स्थितीत आहेत. प्रवेशद्वारापासून किल्ल्यापर्यंतच्या रस्त्याचे अद्याप डांबरीकरण झाले नाही, अशा तक्रारीही येथील पर्यटकांनी ‘सकाळ’कडे मांडल्या.
योजनेत या किल्ल्यांचादेखील आहे समावेश...
शिरगाव किल्ला (पालघर), भूदरगड, विशाळगड, रांगणा किल्ला (कोल्हापूर), तोरणा, कोयरीगड (पुणे), खर्डा किल्ला (नगर), अंबागड किल्ला (भंडारा), माणिकगड (चंद्रपूर), नगरधन किल्ला (नागपूर), वेताळवाडी किल्ला, अंतूर किल्ला (औरंगाबाद), परंडा किल्ला (उस्मानाबाद), धारूर किल्ला (बीड), औसा किल्ला (लातूर), कंधार किल्ला, माहुर किल्ला (नांदेड), पूर्णगड, बाणकोट किल्ला (रत्नागिरी), उंदेरी किल्ला (रायगड), भरतगड, यशवंतगड (सिंधुदुर्ग), गाळणा किल्ला, अंकाई, टंकाई, साल्हेर, मुल्हेर (नाशिक), लळिंग किल्ला (धुळे).
सरकारच्या गड-किल्ले संवर्धन समितीने सुचविलेल्या राज्यातील 28 किल्ल्यांवर डागडुजीची कामे सुरू आहेत. काही गडांवरील कामे पूर्णही झाली आहेत. समितीने दिलेल्या यादीत उदगीरमधील भुईकोट किल्ल्याचा समावेश नाही, हे खरे आहे. हा एक महत्वाचा किल्ला आहे. त्यामुळे निधी उपलब्ध झाला की येथेही डागडुजीची कामे केली जातील.
तेजस गर्गे, संचालक, महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग