ग्रामीण भागातील ९१७ वस्तीशाळा कायमच्या बंद ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020

7 राज्यातील ९१७ वस्तीशाळा सुरू ठेवा
शिक्षक आमदार कपिल पाटील यांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

मुंबई : शिक्षण विभागाने २० फेब्रुवारीला काढलेल्या अध्यादेशामुळे राज्याच्या ग्रामीण भागातील ९१७ वस्तीशाळा कायमच्या बंद होणार आहेत. गरिबांच्या शाळा बंद करण्याचे भाजपचे धोरण महाविकास आघाडीच्या शिक्षणमंत्र्यांनी राबवू नये. हा अध्यादेश तातडीने मागे घेऊन ९१७ वस्तीशाळा सुरू ठेवाव्यात, अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्र्यांकडे पत्राद्वारे 
केली आहे.

दुर्गम भागांतील मुलांना नजीकच्या शाळेत जाण्या-येण्यासाठी वाहतूक व्यवस्था केल्याबद्दल सरकार पाठ थोपटून घेत आहे. माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यकाळात बंद झालेल्या बहुतेक शाळा त्याच ठिकाणी होत्या व त्यांत आणखी काही ठिकाणांची भर घालण्यात आल्याचे दिसते. म्हणजे सुरू असलेल्या शाळा बंद करायच्या आणि दुर्गम भागात वाहन व्यवस्था केल्याचा दावा केला जातो. याचा अर्थ ९१७ वस्तीशाळा कायमच्या बंद होणार आहेत, असे आमदार पाटील यांनी शिक्षणमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

या निर्णयामुळे प्राथमिक शाळेतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची दूर असलेल्या गावातील शाळेत फरपट होईल. तब्बल ४ हजार ८७५ विद्यार्थी गावातील शाळेपासून वंचित राहतील. मुलींचे शिक्षण तर जवळपास बंदच होईल, अशी भीती त्यांनी या पत्रात व्यक्त केली आहे. अधिकाऱ्यांवर विसंबून निर्णय घेतल्यास काय होते, त्याचा हा अध्यादेश नमुना आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. नव्या सरकारने मागील सरकारचे गरीबविरोधी धोरण पुढे चालवू नये. हा अध्यादेश तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी आमदार पाटील यांनी 
केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News