PUBG खेळण्याच्या नादात १६ वर्षीय मुलाने गमावला जीव

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 August 2020
  • PUBG या ऑनलाईन खेळाचं व्यसन तरुणांच्या आयुष्याकरीता फार घातक ठरू लागले आहे.
  • PUBG हा ऑनलाईन खेळ खेळण्याच्या नादात तरुणांसमवेत अनेक लहान मुलांनी केलेले पराक्रम आपण अनेक वेळा बातम्यांमध्ये पाहत असतो.
  • अशीच एक घटना आंध्रप्रदेशातील एका शहरात घडली आहे.

हैदराबाद :-  PUBG या ऑनलाईन खेळाचं व्यसन तरुणांच्या आयुष्याकरीता फार घातक ठरू लागले आहे. PUBG हा ऑनलाईन खेळ खेळण्याच्या नादात तरुणांसमवेत अनेक लहान मुलांनी केलेले पराक्रम आपण अनेक वेळा बातम्यांमध्ये पाहत असतो. अशीच एक घटना आंध्रप्रदेशातील एका शहरात घडली आहे. एका १६ वर्षीय मुलाने PUBG खेळाच्या नादात अन्न पाण्याचा त्याग केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. हा १६ वर्षीय तरुण  लॉकडाऊन असल्याने मागील अनेक महिन्यांपासून आपल्या घरीच राहत होता. याच काळात त्याला PUBG या खेळाचे व्यसन लागले. तो हा ऑनलाईन गेम खेळण्यात इतका मग्न व्ह्याचा की त्याने त्या खेळाकरीता अन्न पाण्याचाही त्याग केला. खेळात गुंग असल्याने तो अनेक दिवस जेवायचं ही नाही.  घरचे समजवायला गेले कि त्यांचा ही तो खूप राग करायचा. याकारणामुळे त्याची एकदिवस तब्बेत बिघडली आणि त्याला डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागला.  इलूर येथील एका इस्पितळात त्याला दाखल करण्यात आले. अनेक दिवस अन्नपाणी प्राशन न केल्यामुळे त्याच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण सतत कमी होत होते आणि अखेर सोमवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.    

काही महिन्यांपूर्वी पुण्यातील तरुणाची अशीच एक घटना समोर आली होती. अनेक तास PUBG हा गेम खेळल्याने हर्षल मेमाणे ह्या तरुणाला ब्रेन स्ट्रोक आला होता. पंजाब मधील मुलाने PUBG खेळासाठी आपल्या आईवडिलांच्या खात्यातील तब्बल १६ लाख रुपये खर्च केले होते. 

भिवंडी मधील एका अल्पवयीन मुलाच्या भावाने त्याला PUBG खेळण्यास विरोध केल्यामुळे त्या अल्पवयीन मुलाकडून भावाची हत्या करण्यात आल्याची  धक्कादायक घटना घडली होती. आपली मुलं त्यांच्या हातात असलेल्या मोबाईल तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक साधनांचा कश्याप्रकारे उपयोग करतात ह्यावर पालकांनी लक्ष ठेवणे फार गरजेचे आहे. अनेकदा एकलकोंडीपणा आल्याने अनेक मुलं PUBG तसेच ब्लू व्हेल यासारख्या घातक ऑनलाईन खेळांच्या आहारी जातात आणि त्यामुळे त्यांच्या हातून अनेक चुकीची कृत्य होतात. म्हणून जर आपली मुलं PUBG किंवा यासारख्या कोणत्या ऑनलाईन खेळाच्या आहारी जात असल्यास त्यांना समजावणे तसेच वेळ पडल्यास मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणे अतिशय गरजेचे आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News