15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि मग दंड; जात पंचायतीचा फास

हर्षल भदाणे
Tuesday, 4 June 2019
  • शहर असो किंवा गाव, आजच्या तरुणी कुठेही सुरक्षित नाहीत.

धुळे : तरुणींसाठी धुळे तर अजिबात सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील धोंगडीपाडा हे गाव सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलं आहे. धुळ्यात जात पंचायती मधील एका सदस्याच्या नातेवाईकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. कालांतराने हि पिडीत मुलगी गरोदर राहिली. हि बाब तिच्या आई वडिलांच्या लक्षात आल्यावर याबाबत ते न्याय मागण्यासाठी जात पंचायतीकडे गेले असता त्यांनी गर्भपात करण्याचा आणि ११ हजार रुपये दंड भरण्याची अजब मागणी केली. मात्र सदर पिडीत मुलीने गर्भपात न केल्याने जात पंचायतीने या कुटुंबाला वाळीत टाकलं आहे.  हि पिडीत मुलगी धुळे  जिल्हा रुग्णालयात प्रसूत झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. 

साक्री तालुक्यातील धोंगडीपाडा गावातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे आईवडील मोलमजुरी करण्यासाठी गुजरात येथे गेले होते. ते एप्रिल महिन्यात घरी परतल्यावर आपली मुलगी ८ महिन्यांची गरोदर असल्याचं त्यांना समजलं. याबाबत मुलीला विचारल्यावर तिने घडलेला सगळा प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला. गावातील जात पंचायत सदस्याच्या नातेवाईकाने या अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केले. या घडलेल्या प्रकाराबाबत न्याय मागण्यासाठी पीडित मुलीचे आई वडील जात पंचायतीसमोर गेले असता यावर गोळ्या देऊन गर्भ काढून टाकण्याचे फर्मान सोडले. हा फर्मान पीडित मुलीच्या आई वडिलांनी धुडकावून लावत याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

मात्र सुरुवातीला पोलिसांनी देखील टाळाटाळ केली. उलट "गावातील प्रकरण गावातच मिटवा" असा अजब सल्ला त्यांनी दिला. यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर जात पंचायतीने तक्रार परत घ्या किंवा ११ हजार रुपये दंड भरा असे फर्मान काढले. हि अल्पवयीन मुलगी सध्या धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून तिने नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे. पीडित मुलीने गर्भापात केला नाही म्हणून जात पंचायतीने या कुटुंबाला वाळीत टाकले आहे.

गेल्या २ महिन्यांपासून या कुटुंबावर दबाव टाकण्यात येत असून गावात पाणी भरू दिले जात नाही, तसेच गिरणीवर दळण दळू दिले जात नाही. आम्हाला सारख्या धमक्या दिल्या जात असून आम्ही प्रचंड दहशतीखाली आहोत आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी या पीडित मुलीच्या आई वडिलांनी केली आहे.या अशा लाजिरवण्या घटने नंतर पोलीस यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News