पर्यटन व्यावसायिकांना १० वर्षांचा परवाना मिळणार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 June 2019

आमदार निरंजन डावखरे यांच्या सूचनेवर पर्यटन राज्यमंत्र्यांची माहिती

अलिबाग: कोकणातील पर्यटन व्यावसायिकांना परवाना देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून १० वर्षांसाठी परवाने देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, अशी माहिती पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी विधान परिषदेत दिली. कोकणातील पर्यटन विकासाच्या आराखड्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याची आमदार निरंजन डावखरे यांची मागणी मान्य करण्यात आली.

कोकणातील साहसी क्रीडा प्रकारांसंदर्भातील धोरण, पर्यटकांची सुरक्षा व पर्यटन विकास आराखड्यासंदर्भात आमदार निरंजन डावखरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या सूचनेद्वारे मुरूड येथील समुद्रकिनाऱ्यावर पॅरासेलिंग करताना सुरक्षेअभावी झालेल्या एका १५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्यावर मंत्री येरावार यांनी उत्तर दिले.

पर्यटनाला वेग देण्यासाठी महत्त्वपूर्ण साहसी खेळांबाबत तरुणांना प्रशिक्षण घेण्यासाठी गोव्याला जावे लागते; तर या व्यवसायासाठी केवळ एक वर्षाचा परवाना दिला जातो. त्यामुळे दर ११ महिन्यांनी नूतनीकरणासाठी धाव घ्यावी लागते. त्याचबरोबर वर्षभराच्या परवानगीमुळे बॅंकांकडून कर्जपुरवठा केला जात नाही. या पार्श्‍वभूमीवर १० वर्षांसाठी परवाने द्यावेत, अशी आग्रही मागणी आमदार डावखरे यांनी केली. पर्यटनाबाबत वेगवेगळ्या यंत्रणांकडून परवानगी दिली जाते. या पार्श्‍वभूमीवर परवाने देण्यासाठी एकच यंत्रणा उभारण्याचाही आग्रह आमदार निरंजन डावखरे यांनी धरला. त्यावर मंत्री येरावार यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली. कोकणाच्या पर्यटन विकास आराखड्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घ्यावी, अशी मागणीही डावखरे यांनी केली. रायगडमधील किनाऱ्यांवर पर्यटकांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्यासाठी ७८ लाखांचा निधी मंजूर केला आहे.

२५ जीवरक्षकांना प्रशिक्षण 
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर या किनाऱ्यांवर प्रत्येकी २५ जीवरक्षकांच्या प्रशिक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी देण्यात आला आहे. विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेवर ही माहिती देण्यात आली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News