‘नदी रुसली, नदी हसली’

शंकर कुद्रे, देगलूर
Wednesday, 29 July 2020
  • बालसाहित्याच्या जगात ज्यांनी अधिराज्य गाजवले ते सुप्रसिद्ध बालसाहित्यकार, महाराष्ट्र शासनाचे सलग तीन वर्ष उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार प्राप्‍त केलेले एक तपस्वी आचार्य, माजी मुख्याध्यापक, शिक्षणक्षेत्रात एक उपक्रमशील शिक्षक म्हणून ज्यांची ख्याती आहे असे राष्ट्रपती पुरस्कारप्राप्‍त आदर्श शिक्षक डॉ.सुरेश सावंत यांचे 37वे पुस्तक ‘नदी रुसली, नदी हसली’ हा बालकुमारांसाठीचा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.

बालसाहित्याच्या जगात ज्यांनी अधिराज्य गाजवले ते सुप्रसिद्ध बालसाहित्यकार, महाराष्ट्र शासनाचे सलग तीन वर्ष उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार प्राप्‍त केलेले एक तपस्वी आचार्य, माजी मुख्याध्यापक, शिक्षणक्षेत्रात एक उपक्रमशील शिक्षक म्हणून ज्यांची ख्याती आहे असे राष्ट्रपती पुरस्कारप्राप्‍त आदर्श शिक्षक डॉ.सुरेश सावंत यांचे 37वे पुस्तक ‘नदी रुसली, नदी हसली’ हा बालकुमारांसाठीचा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.

यातील कविता एकापेक्षा एक सरस आहेत. या संग्रहात एकूण 28 कविता आहेत. विविध विषय हाताळणारा हा कवितासंग्रह बालवाचकांच्या मनावर जीवनमूल्ये बिंबवणारा आहे. संस्कार रुजवणारा हा काव्यसंग्रह जगण्याची प्रेरणा व उमेदही देतो. त्यामुळे कवीच्या लेखनशैलीचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.

‘नदी रुसली, नदी हसली’ ही पहिलीच कविता आहे. नदीच्या मुख्य प्रवाहात, तिच्या नैसर्गिक असण्यात मानवाने बरेच बदल केले आहेत. धरणे बांधली, शहरातील व कारखान्यांतील घाण पाणी नदीत सोडले. त्यामुळे नदीचे पवित्र तीर्थ नासवले. रेती, दगड व माती अशी खनिजसंपत्ती काढून नदीला खोल जखमा केल्या. त्यामुळे आपण अपराधी आहोत. या मानवाच्या छळामुळे नदीमाय रडते आहे, असा पर्यावरणवादी संदेश कवींने या कवितेतून बालमनावर रुजविलेला आहे. आनंद व शिकवण दोन्हींची सांगड कवीने या कवितेत घातली आहे.

जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी, हा या जगाचा अन्नदाताही आहे. तो भूमिपुत्र आहे. त्याच्या जीवनावरील ‘अन्नदाता’ नावाची कविता अतिशय सुंदर आहे. शब्दांची गुंफण, कवितेची गेयता वाचकाला मंत्रमुग्ध करते आणि हेच कवीच्या लेखनाचे सामर्थ्य आहे. बालपणीच्या वर्गाचा किंवा त्या मित्रांचा आनंद आणि त्यांचे अनुभव पुन्हा कधीही मिळत नाही, म्हणून कवी म्हणतो -

‘वर्गाने जे अनुभवले ते स्वर्गालाही कळणार नाही

बालपणीचे निखळ सुख जीवनभर मिळणार नाही.’

बालपणी आपण कागदापासून वेगवेगळ्या वस्तू बनवतो, त्याविषयीची एक कविताच ‘कागदाची कमाल’ मध्ये आहे. येथे कवीने बालवाचकांना आवडेल असा संदेश खालील ओळींतून देत आहे.

‘कविता लिहिली कागदावर,

कोरून बसली काळजावर’

स्मार्ट फोनच्या दुनियेत हल्ली लोकांना सेल्फी काढण्याचे वेड लागले आहे. सेल्फी काढताना काहीजण मेले तरीही, सेल्फी काढण्याचा वेडेपणा काही कमी होत नाही.

‘सेल्फिश लोकांचा सेल्फिश गाव

सेल्फीला आला भलताच भाव.

रस्त्यावर सेल्फीचा मोह नडला

तोल जाऊन गटारात पडला’

म्हणून कवी म्हणतो, कशाचाही अतिरेक करू नये. मोबाईलच्या दुनियेत मुलांचे वाचन बंदच झाले आहे. परंतु कवी म्हणतात...

‘ग्रंथसखा, ग्रंथमित्र

आम्ही पुस्तकप्रेमी

वाचनवीर होण्याची

संधी आली नामी’

ही कविता बालमनावर वाचनसंस्कृती रुजविण्याची प्रेरणा देते. ‘तिमिरातून तेजाकडे’ जीवनाला घेऊन जाण्यासाठी आपणाला विद्यालयात जावे लागते. तसेच विद्यालय गीतही ‘राजर्षी शाहू विद्यालय आमुचे तीर्थक्षेत्र आहे.’ अशा आशयाची कविता आहे. पुस्तक वाचन व शिक्षण हे कसे जीवनाला आवश्यक आहे हे या दोन कवितांतून वाचकाला प्रेरित करतात.

जगात असा एकही मानव नाही, ज्याला भीती नाही. भीतीमुळे मनातली आनंदाने जगण्याची आशा धूसर होते. त्यामुळे भीती जर मनातून काढली, तर खरा आनंद मिळेल. म्हणून कवी ‘आनंदाने जगण्याचा मंत्र’ या कवितेत म्हणतात...

‘चिंतेची बहीण भीती

भीती असते निराधार

भीती आनंदाची मारेकरी

भीती एक घातक आजार’

भीतीतून चिंता वाढते, म्हणून ‘चिंतोबा’ नावाची एक कविता कवीने खूपच मार्मिक अशा शब्दांत लिहिली आहे. चिंता आणि चिता एकसमान असतात म्हणून चिंता करू नये, असा संदेश कवितेतून कवीने दिला आहे.

मन, मेंदू आणि मनगटाने तुझे सर्व प्रश्‍न सुटतील, पण तू ‘चालढकल’ करू नकोस अशा विचाराने प्रेरित करणारी प्रेरणादायी कविता बालकांना पेटविते. खर्‍या अर्थाने अभ्यासपूर्ण शिक्षण झाले, तर वैज्ञानिक दृष्टिकोन मनात निर्माण होईल, म्हणून कवी एका कवितेत ‘विज्ञानसाक्षर होऊ’, असे आवाहन करतो. माणूस जर विज्ञानसाक्षर झाला, तर अंधश्रद्धा पाळणार नाही. मंत्र-तंत्र नि कर्मकांड यातील फरक, त्यामागचा कार्यकारणभाव ओळखेल, वाचकांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणारी ही प्रभावी कविता आहे.

या सर्व गोष्टी शिकण्यासाठी शाळेत जावे लागेल. ‘माझी शाळा’ या कवितेतून कवी सांगतात, परिपाठापासून सुरू होणारे वेगवेगळे संस्कार शेवटच्या तासापर्यंत घडतच असतात. मानवता, धर्मनिरपेक्षता, देशप्रेम, देशभक्‍ती, कष्टाळूवृत्ती, व्यावहारिक ज्ञान, सण-उत्सवांची महती शाळेतूनच मिळते. चॉकलेट-गोळ्या, चापट-पोळ्या, धम्मकलाडू, तीळपापड, धिरडे, कांदा अशा खाद्यपदार्थांचे ‘खाद्यजत्रा’ या कवितेतून मार्मिक अशा शब्दांत व्यंगात्मक चित्रण केले आहे.

प्राणिमात्रांवर प्रेम करायला सांगणार्‍या ह्या निसर्गकवीने महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू यावर अतिशय सुंदर व अप्रतिम कविता रचलेली आहे.

‘महाराष्ट्राचे मानचिन्ह

ही जंगलची शान

राज्यप्राणी म्हणून हिला

मिळालेला मान.

जंगलच्या ह्या राणीला

देऊ नका त्रास

दुर्मीळ अशा जीवाचा

सुरक्षित राहो अधिवास’

पर्यावरणाचा वसा घेतलेल्या कवीने, ‘पर्यावरणपूरक गणपती’ नावाच्या कवितेत पर्यावरणाला मारक ठरणार्‍या गणेशउत्सवातील सर्व गोष्टींचा उलगडा केला आहे. कृत्रिमतेच्या आहारी जाऊन माणूस कसा स्वतःच्या पायावर दगड मारून घेत आहे, ते या कवितेतून फार छान मांडले आहे.

‘आपणच आपल्या हितासाठी, वसुंधरेचाही विचार करू,

आपले सगळे सणउत्सव पर्यावरणपूरक साजरे करू’

मानवाच्या विकृत वर्तनामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत चालला आहे. निसर्गचक्र बदलत आहे. पाऊस पडत नाही म्हणून कवी विनवणी करतात की,

‘पावसा पावसा रूसवा सोड

धरतीमातेशी नातं जोड’

असे जर झाले तर पाऊस आपल्या धरतीवर येईल. जेव्हा पाऊस आपल्या पृथ्वीशी नाते जोडेल, तेव्हा धरती सजेल, हिरवा शालू पांघरेल, फुलांचा डोंगर सजेल.

‘निसर्ग सौंदर्याचा खजिना

पाहा मोकळा झाला

वनदेवीचे स्वागत करण्या

स्वर्ग धरेवर आला’

असे निसर्गप्रेमी विचार कवी बालमनावर बिंबवताना दिसतात. निसर्ग आणि पर्यावरण यांचे एक अतूट नाते आहे. ते एक चक्र आहे. ते चक्र मानवाने स्वार्थासाठी तोडू नये, असा संदेश ‘श्रावण’ व ‘फुलांचा डोंगर’ या कवितेतून दिला आहे. कवीच्या सटीक नजरेने टिपलेले सौंदर्य आणि निसर्गाच्या दुःखाच्या जाणिवा कवीने अलगद हेरल्या आहेत.

आजच्या संगणकाच्या युगात टी.व्ही. नसलेले घर सापडणे मुश्कीलच. कोणाच्याही घरी गेले की लहान मुले टी.व्ही.तले कार्टून पहाण्यात दंग झालेले दिसतात. कार्टूनच्या, राक्षसांच्या मालिका त्यांना खिळवून ठेवतात. मुलांना अभ्यासापासून दूर नेतात. याचे वास्तव चित्रण कवीने ‘टी.व्ही.मधला राक्षस’ या कवितेत केले आहे.

‘रंगीबेरंगी राक्षस, टी.व्ही.मधून डोकावतो

अभ्यासाचा सगळा वेळ, तोच खाऊन टाकतो.’

कोणालाही विचारा - तुमच्या गल्लीतली पोरं कशी आहेत? तेव्हा प्रत्येकजण नकारात्मकच बोलेल; परंतु कवी डॉ.सावंत बालमनावर सकारात्मक विचार बिंबवताना दिसतात.

‘अभ्यासाच्या वेळी अभ्यास

खेळाच्या वेळी खेळ

म्हणूनच तर जमतो

आमचा सगळ्यांचा मेळ’

असा हा सकारात्मक विचार ‘आमच्या गल्लीतली पोरं’ या कवितेत कवीने मांडला आहे.

एकंदरीत संपूर्ण कवितासंग्रह अतिशय उत्कृष्ट दर्जाचा आहे. साधी आणि सोपी भाषा, सहज समजणारे नादानुकारी शब्द, प्रत्येक कवितेतून सहज उद्बोधन, प्रेरणादायी, नावीन्यपूर्ण विषय, वर्तमानात जगताना भूतकाळाची सांगड घालून भविष्याचा वेध घेणार्‍या कविता, वाचकांचं मन हेलावून टाकतात. चित्रमय रंगीत छपाई बालवाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. आकर्षक मुखपृष्ठ, सुंदर छपाई, आकर्षक बांधणी, मोठ्या लिपीतील अक्षरे या पुस्तकाच्या जमेच्या बाजू आहेत. या बालवाचकाला नक्कीच आवडतील. वाचकवर्ग  ह्या पुस्तकाचे भरभरून स्वागत करील, असा मला विश्वास वाटतो.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News