येतंय, "आमच्या 'ही'चं प्रकरण"

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 5 April 2019

"आमच्या 'ही'चं प्रकरण" या खास विनोदी नाटकाचा विनामूल्य प्रयोग येतोय तुमच्या भेटीला...

‘नाटक बघुया, नाटक जपूया

दादर सांस्कृतिक मंचाच्या दुसर्‍या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि ‘मुंबई बीट्स’ या संस्थेच्या सहकार्याने दिनांक १२ एप्रिल २०१९ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता, रविन्द्र नाट्य मंदिर येथे, निखिल रत्नपारखी, भार्गवी चिरमुले, नंदिता पाटकर, आनंद काळे, मयुरेश खोले, प्रियदर्शनी इंदलकर यांचं "आमच्या 'ही'चं प्रकरण" या खास विनोदी नाटकाचा प्रयोग रसिकांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आला आहे.

दादरमधील सांस्कृतिक वैभव जपण्यासाठी, दादरमध्ये विविध संकल्पना साकारण्यासाठी तसेच दादर प्रेमी मंडळीना एकत्र आणण्यासाठी दादर सांस्कृतिक मंचाची स्थापना करण्यात आली आहे. दादर सांस्कृतिक मंचाच्या माध्यमातून महिला, पुरुष, तरुण वर्ग व ज्येष्ठ नागरिक या सर्वांसाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. यात सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, क्रिडा विषयक असे सर्व प्रकारचे कार्यक्रम समाविष्ट असतात.

मराठी माणूस हा खऱ्या अर्थाने नाटकवेडा प्रेक्षक म्हणूनच महाराष्ट्राला नाट्यसृष्टीची खूप मोठी परंपरा लाभली आहे. नाटक आणि रंगभूमी म्हणजे मराठी माणसाच्या मनाचे हळवे कोपरे; पण हल्ली म्हणावे तितके प्रेक्षक नाटकांना हजेरी लावत नाहीत. हेच चित्र बदलण्यासाठी, खारीचा वाटा म्हणून दादर सांस्कृतिक मंचाने ‘आमच्या ‘हि’चं प्रकरण’ या नाटकाचा प्रयोग विनामूल्य आयोजित केला आहे.

विशेष म्हणजे ‘मुंबई बीट्स’ या संस्थेच्या सहकार्याने कलाक्षेत्रातील मान्यवरांना कलारंजन पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. या वर्षी ज्येष्ठ संगीतकार आणि गीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि प्रख्यात दिग्दर्शक सतीश राजवाडे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून सुट्टी देणारं, सगळे ताण तणाव विसरून तुम्हाला खळखळून हसवणारं असं हे धम्माल नाटक बघायला सर्व नाट्य रसिकांनी नक्कीच गर्दी करावी. तेव्हा, तमाम रसिक प्रेक्षकांनी या सुवर्ण संधीचा हमखास लाभ घ्यावा असं आवाहन दादर सांस्कृतिक मंचाच्या अध्यक्षा उत्तरा मोने यांनी केलं आहे.

नाटकाच्या विनामूल्य प्रवेशिका, नाटकाच्या दोन तास आधी, नाट्यगृहा बाहेर, उपलब्ध करण्यात येतील. २०१९-२० ह्या वर्षातील दादर सांस्कृतिक मंचच्या सगळ्या सभासदांना प्रथम प्राधान्य असेल, याची कृपया नोंद घ्यावी. प्रयोगाच्या दिवशीदेखील आपण मेंबरशिप घेऊ शकता. दादर सांस्कृतिक मंचाच्या दुसऱ्या वर्धापन दिनासाठी अर्जुन मुद्दा आणि केदार ओक यांचं विशेष सहकार्य लाभलं आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क - ८४२२९८०९०४, ८४२२९८०९०५/ 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News