युवकांसाठी दिशादर्शक उपक्रम

संदीप वासलेकर
Sunday, 11 August 2019

महाराष्ट्रातल्या युवकांना दिशा मिळण्यासाठी आणि आपलं कौशल्य वाढवण्यासाठी ज्या उपक्रमांचा फायदा होईल अशा काही उपक्रमांची माहिती या सदरातून पूर्वी वेळोवेळी सविस्तररीत्या प्रसिद्ध झालेली आहे. त्यातल्याच काही निवडक उपक्रमांची ही पुन्हा एकदा थोडक्यात ओळख.

महाराष्ट्रातल्या युवकांना दिशा मिळण्यासाठी आणि आपलं कौशल्य वाढवण्यासाठी ज्या उपक्रमांचा फायदा होईल अशा काही उपक्रमांची माहिती या सदरातून पूर्वी वेळोवेळी सविस्तररीत्या प्रसिद्ध झालेली आहे. त्यातल्याच काही निवडक उपक्रमांची ही पुन्हा एकदा थोडक्यात ओळख.

मी स्वतःला काही बाबतींत सुदैवी समजतो. समाजात सकारात्मक कार्य करणाऱ्या व्यक्ती मला अनेकदा भेटतात. त्यांच्याशी गप्पा मारून प्रेरणा मिळते. अशा व्यक्तींकडून कळलेल्या अनेक उपक्रमांबद्दल मी या सदरात यापूर्वी लिहिलेलं आहे. त्यातले मला जे सर्वात प्रभावी उपक्रम वाटले व ज्यांमुळे महाराष्ट्रातल्या युवकांना दिशा मिळण्यासाठी आणि आपलं कौशल्य वाढवण्यासाठी फायदा होईल अशा उपक्रमांची माहिती संक्षिप्तपणे मी या लेखात देत आहे. सविस्तर माहिती पाहिजे असल्यास ती इंटरनेटवर शोधल्यास सहज सापडेल, तसंच ‘सप्तरंग’मधले माझे पूर्वीचे लेख शोधल्यास त्यांतूनही जास्त माहिती मिळेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेला ‘मुख्यमंत्री फेलोशिप’ हा उपक्रम मला खूप आवडला. यात कोणतंही राजकारण न आणता केवळ गुणवत्तेवर पदवीधर युवकांची निवड होते. ते युवक वर्षभर सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांत काम करतात. त्यांना सरकारी धोरणांसंबंधी सूचना करण्याचीही संधी मिळते. एक वर्षभर फेलोशिपचा अनुभव घेतला तर काही जणांना राज्य सरकारच्या काही विभागांत करिअर करण्याची संधी मिळू शकते. ज्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे व आयएएस होण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा अनुभव खूपच मौल्यवान आहे. मुख्यमंत्री-कार्यालयाच्या संकेतस्थळावर या उपक्रमांची सविस्तर माहिती मिळेल.
मुख्यमंत्री-कार्यालयात प्रिया खान या उपक्रमाच्या प्रमुख आहेत. त्यांच्याशी पत्राद्वारे संपर्क साधल्यास त्यांच्याकडूनही जास्त माहिती मिळेल.

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे प्रायोजित करण्यात आलेला ‘यिन’ हा विद्यार्थ्यांची नेतृत्वक्षमता बळकट करणारा उपक्रम मला खूप आवडतो. महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांतून विद्यार्थी ‘यिन’चे म्हणजे ‘यंग इन्स्पिरेटर नेटवर्क’चे प्रतिनिधी निवडतात. विद्यार्थी-मंत्रिमंडळ स्थापन करण्यात येतं. ते वास्तवातल्या राज्य सरकारमधल्या मंत्रिमहोदयांबरोबर चर्चा करतं. विधिमंडळाला भेट देतं. स्वतःचा ‘विद्यार्थी-मुख्यमंत्री’ निवडला जातो. विविध खात्यांचे मंत्री निवडले जातात. ते वर्षभर काम करून शेवटी आपला अहवाल सादर करतात. मी भारतात असतो तेव्हा ‘यिन’च्या कार्यक्रमांना अवश्य जातो. तिथं खरे मंत्री व नेते आलेले असतात. ‘यिन’मध्ये काम केलेल्या विद्यार्थी-नेत्यांची पंचायत, जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या पदांवर निवड झाल्याचं ऐकून आहे. ज्यांना उद्याचा महाराष्ट्र घडवायचा आहे त्यांनी विद्यार्थिदशेत असताना ‘यिन’मध्ये अवश्य कार्यरत व्हावं.

ज्यांना भारताचं प्रतिनिधित्व जगात करायचं आहे त्यांच्यासाठी ‘सिम्बायोसिस’ या शैक्षणिक संस्था समूहातर्फे ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ हा अभ्यासक्रम आहे. ही संस्था पुण्यात आहे. सध्या ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ या विषयावर इंग्लडमध्ये अनेक अभ्यासक्रम आहेत; पण त्यांचा दर्जा फारसा चांगला नाही. शिवाय, कारण नसताना पैशाचा अपव्यय होतो. ज्यांना डिप्लोमसीमध्ये आयुष्य घडवायचं आहे त्यांनी इंग्लडपेक्षा पुण्यातल्या ‘सिम्बायोसिस’मध्ये ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ या विषयातल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला तर ते हिताचं आहे. अधिक माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर मिळेल.

जे युवक ग्रामीण भागातले आहेत त्यांच्यासाठी ‘खादी ग्रामोद्योग मंडळा’तर्फे अनेक प्रशिक्षण-कार्यक्रम आयोजिले जातात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंडळाचं आधुनिकीकरण करण्यासाठी विशाल चोरडिया या तडफदार व चैतन्यशील युवा उद्योजकाची सभापती म्हणून निवड केली. आता चोरडिया यांनी मधुमक्षिकापालन, बांबूव्यवसाय, ग्रामीण हस्तकला या क्षेत्रांतल्या युवकांमध्ये आधुनिक दृष्टिकोन वाढीस लावून त्यांच्या मालाला मोठी बाजारपेठ मिळावी यासाठी प्रशिक्षणाचे उपक्रम राबवले आहेत. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या युवकांपर्यंत याची माहिती पोचली पाहिजे.

शहरी व निमशहरी भागांत ज्यांना ‘स्टार्ट अप’ सुरू करण्यात यश आलं आहे व ज्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठा काबीज करायच्या आहेत अथवा अद्ययावत तंत्रज्ञान प्राप्त करायचं आहे अशा ३० ते ४० या वयोगटांतल्या उद्योजकांना ‘होरासिस’ ची वार्षिक भारत परिषद ही सुवर्णसंधी आहे. स्वित्झर्लंडमधली ‘होरासिस’ ही संस्था दरवर्षी जून महिन्यात ‘भारत औद्योगिक परिषद’ आयोजित करते. ही छोटी ‘दावोस’ झाली. जानेवारीत होणाऱ्या ‘दावोस’मध्ये केवळ खूप मोठ्या उद्योगपतींना प्रवेश मिळतो; परंतु ‘स्टार्ट अप’मध्ये यश मिळालेल्या युवा उद्योजकांना जूनमध्ये युरोपमधल्या एका सुंदर गावात होणारी ही परिषद खूप उपयुक्त ठरेल. भारतात रस असलेले परदेशी उद्योजक तिथं भेटतील, त्यांच्याबरोबर सहकार्य करण्याची संधी मिळेल, भारतातले मोठे उद्योजक व राजकीय नेते भेटतील. त्यांना इथं भारतात भेटणं शक्‍य नसतं; पण ‘होरासिस’मध्ये त्यांच्याशी मैत्रीही करता येऊ शकते. अधिक माहिती www.horasis.org या संकेतस्थळावर मिळू शकेल.

सामाजिक नेतृत्व, प्रशासन, ग्रामीण उद्योग, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उद्योग, आंतरराष्ट्रीय संबंध या विषयांत मला जे प्रभावी उपक्रम वाटले त्यांचा मी वर संक्षिप्त उल्लेख केला आहे व पूर्वी या सदारातल्या लेखांमधून सविस्तर माहितीही दिलेली आहे. अर्थात, या क्षेत्रात इतरही उपक्रम असतील याची मला जाणीव आहे; पण त्यांची माहिती नाही.

मला एका गोष्टीची खंत वाटते. विज्ञान व तंत्रज्ञान यात युवकांना मूलभूत संशोधन करणं शक्‍य व्हावं म्हणून आपल्याकडं एकही चांगला उपक्रम माझ्या दृष्टीस आला नाही. जैविकशास्त्र, नॅनोतंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial intelligence) या क्षेत्रांत जिथं युवक जागतिक तुलनेत आघाडी घेतील तेच देश भविष्यात जगाचं नेतृत्व करतील. या विषयात संशोधनकेंद्रं स्थापन करण्यासाठी आपल्या मोठ्या उद्योगपतींनी समाजाविषयीचं उत्तरदायित्व म्हणून जबाबदारी स्वीकारली पाहिजे. दुर्दैवानं त्यासंबंधीच्या इच्छाशक्तीचा अभाव आहे. या नवीन क्षेत्रांत मूलभूत संशोधनक्षमता वाढवण्याच्या दृष्टीनं आयआयटीसारख्या प्रसिद्ध संस्थांमध्येही जागतिक दर्जाचं प्रशिक्षण मिळत नाही. वैज्ञानिक संशोधनात युवकांना दिशा मिळण्यासाठी सुविधांची गरज आहे, तसंच शेतकी व अन्नप्रक्रियेच्या व्यवसायातही उच्च दर्जाचं प्रशिक्षण मिळण्यासाठी अद्ययावत कृषी विज्ञान केंद्रांचं जाळं असणं आवश्यक आहे.

अर्थात, उपक्रम काही क्रांती घडवून आणत नसतात. मात्र, ज्यांना नवीन काही करण्याची इच्छा आहे, त्यांना अशा उपक्रमांमधून कौशल्य व दिशा मिळते; पण चौकटीबाहेरचं काम करण्याची इच्छा मनात येणं हे आपल्यावरच अवलंबून असतं.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News